कोल्हापूर : ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांना अपशब्द; ग्रामस्थांनी ठोकले किणी टोल नाका इमारतीला टाळे | पुढारी

कोल्हापूर : ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांना अपशब्द; ग्रामस्थांनी ठोकले किणी टोल नाका इमारतीला टाळे

किणी; पुढारी वृत्तसेवा : थकीत घरफाळा मागणीसाठी गेलेल्या किणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना अपशब्द वापरल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी टोल नाका इमारतीला आज टाळे ठोकले. याप्रकरणी टोल नाका व्यवस्थापकाने ग्रामस्थांची माफी मागितली.

गेली सतरा वर्षे किणी टोल नाका इमारतीचा घरफाळा ग्रामपंचायत वसूल करत आहे. वसुलीसाठी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाला टोल नाका व्यवस्थापणाचे उंबरे झिजवावे लागतात. गेली तीन वर्षे या इमारतीचा घरफाळा थकीत आहे. वारंवार मागणीसाठी नोटीस देऊनही टोल नाका प्रशासनाने दाद दिली नाही. आज झालेल्या ग्रामसभेत याबाबत चर्चा होऊन ग्रामसभा संपल्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी व काही ग्रामस्थ थकीत घरफाळा मागणीसाठी टोल नाका व्यवस्थापक सचिन देवकर यांच्याकडे गेले.

मात्र, देवकर यांनी पुन्हा उडवाउडवीची उत्तरे देत या पदाधिकाऱ्यांना अपशब्द वापरले. यामुळे चिडलेले पदाधिकारी, ग्रामस्थ आणि देवकर यांच्यामध्ये वादावादी झाली. बघता बघता शेकडो किणी ग्रामस्थ टोल नाक्यावर दाखल झाले. वडगाव पोलिसांना ही माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील सहकऱ्यासह दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थ व टोल प्रशासन यांच्यात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण व्यवस्थापनाने आधी माफी मागावी, नंतरच चर्चा करू, अशी भूमिका घेतली.

अखेर व्यवस्थापक सचिन देवकर यांनी आपली चूक कबूल करत जमावासमोर येऊन माफी मागितली. यानंतर घरफाळा मागणीसाठी चर्चा सुरू केली. मात्र, टोल प्रशासनाने थकीत घरफाळा देण्यासाठी असमर्थता दर्शविली. यामुळे सर्व कर्मचारी व व्यवस्थापनास बाहेर काढून टोल नाका इमारतीस टाळे ठोकण्यात आले. यावेळी किणी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

Back to top button