एसटी बसचे नियोजन कोलमडले बारामती-निरा मार्गावर प्रवाशांची गर्दी | पुढारी

एसटी बसचे नियोजन कोलमडले बारामती-निरा मार्गावर प्रवाशांची गर्दी

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती आगारातून निरा मार्गावर धावणार्‍या एसटी गाड्यांचे नियोजन कोलमडले आहे. सायंकाळनंतर एसटी गाड्यांत प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. खचाखच भरलेल्या एसटीतून प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे. गाडीत चढण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. सायंकाळी वेळेत गाड्या सुटत नसल्याने प्रवाशांना तासनतास गाड्यांची वाट पहावी लागत आहे. सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणार्‍या या मार्गावर एसटी बस वेळेत सोडण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

कोरोनामुळे दोन वर्षांपासून एसटीचे प्रवासी घटले होते मात्र प्रवाशांनी सुरक्षित प्रवासासाठी एसटीलाच पसंती दिली असल्याचे गर्दीवरून स्पष्ट होत आहे. मात्र, वेळेत एसटी येत नसल्याने अनेकांच्या कामाचा खोळंबा होत आहे. विशेषतः सायंकाळी पाचनंतर एसटी वेळेत सुटण्याची गरज विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी केली आहे.

सायंकाळी पाचच्या दरम्यान बारामती आगारातून पणदरे, कोर्‍हाळे, वडगाव, सोमेश्वर- निरा याठिकाणी जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सायंकाळी तास ते आर्धा तास एसटी उशिरा सुटल्यास पुढील गाडीत प्रवाशांची संख्या जास्त होते. यात नोकरदार व विद्यार्थ्यांचा समावेश मोठा असतो. खचाखच भरून एसटीचा प्रवास सुरू होतो.

यात वाहक तर कधीकधी प्रवाशांत वादाचे प्रसंग घडत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी दुपारच्या सत्रातील एसटीच्या फेर्‍या कमी करून त्या सकाळी आणि सायंकाळी वाढवण्याची गरज आहे.निरा आणि सोमेश्वर येथील माळेगाव व बारामतीला शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. याशिवाय विविध कामासाठी येणार्‍या नागरिकांची संख्याही मोठी आहे, यामुळे एसटीचे कोलमडलेले नियोजन सुरळीत करत या मार्गावरील प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

Back to top button