दुसरा श्रावण सोमवार; पुत्रदा एकादशी: परळी वैजनाथ मंदिरात मनमोहक पुष्प सजावट | पुढारी

दुसरा श्रावण सोमवार; पुत्रदा एकादशी: परळी वैजनाथ मंदिरात मनमोहक पुष्प सजावट

परळी वैजनाथ/ रविंद्र जोशी :  बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी आज दुसर्‍या श्रावण सोमवारी परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. आज दुसरा श्रावण सोमवार व पुत्रदा एकादशी असल्याने गेेल्या सोमवारपेक्षा भाविकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. परळी वैजनाथ मंदिरात मनमोहक पुष्पसजावट करण्यात आली आहे.

हर हर महादेवचा जयघोष करत परळी येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण आहे.  श्रावणी सोमवारच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापेैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली. श्रावणीच्या पर्वकाळात परळीत वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी रविवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत.


अपूर्व भक्तीयोग  

पुत्रदा एकादशीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत, जे धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानले जातात. श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी व्रताच्या दिवशी श्रावणाचा दुसरा सोमवार आला आहे. हा पुण्यप्रद अपूर्व भक्तियोग यावर्षी आला आहे. श्रावण सोमवार आणि पुत्रदा एकादशी हे दोन्ही शुभयोग एकत्र आल्याने हा अपूर्व भक्तियोग मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या दर्शनासाठी गर्दी झाली आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी पुत्रदा एकादशीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत. श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी व्रताच्या दिवशी श्रवणाचा दुसरा सोमवार आला आहे. हा एक प्रकारे धार्मिक दृष्टिकोनातून अपूर्व भक्तियोग आहे. त्याचबरोबर पद्म योग आणि सूर्य योग देखील या दिवशी शुभ संयोग तयार करत आहेत. अशा अद्भुत योगाच्या काळात भगवंताची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली. तर त्याचे पुण्य अनेक पटींनी वाढते. श्रावण सोमवार आणि एकादशी व्रत एकाच दिवशी असल्याने भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची कृपा प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा मानली जाते.
– भागवताचार्य हभप सुरेंद्र (बाळू) महाराज उखळीकर (कथाप्रवक्ता व धर्मशास्त्र अभ्यासक)

Back to top button