Kolhapur Flood Relief : पूरग्रस्तांच्या आवश्यक सेवेसाठी हेलीपॅडचे काम युद्धपातळीवर | पुढारी

Kolhapur Flood Relief : पूरग्रस्तांच्या आवश्यक सेवेसाठी हेलीपॅडचे काम युद्धपातळीवर

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : संभाव्य महापुराच्या (Flood Relief) पार्श्वभूमीवर अन्नधान्य व अत्यावश्यक सेवेचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हेलिपॅड बनविण्यात येत आहे. कुरुंदवाडच्या तेरवाड येथील गंगापूर व गुरुदत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर तीन ठिकाणी हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग जयसिंगपूर तर्फे हेलिपॅड तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिरोळ तालुक्यातील निवारा केंद्राचा व पूर परिस्थिती उद्भवणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली होती. यावेळी तीन ठिकाणी हेलिपॅड तयार करण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला होता. (Flood Relief)

कुरुंदवाड, तेरवाड, टाकळीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखाना या ठिकाणी जिल्हाधिकारी रेखावार यांनी भेट देऊन निवारा केंद्राची पाहणी केली. या भागाला कृष्णा-पंचगंगा व दूधगंगा नदीच्या महापुराच्या पाण्याचा विळखा पडल्यानंतर वाहतूक व दळण-वळण सेवा पूर्णपणे बंद होते. अशावेळी या निवारा केंद्राच्या ठिकाणी वैद्यकीय व अन्य अत्यावश्यक सेवा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून हे हेलिपॅड तयार करण्यात येत आहे. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर परिस्थितीचा आढावा घेऊन याठिकाणी पोहचून मदतकार्य करणे सोपे होईल.

सीताबाई पटवर्धन हायस्कूलच्या क्रीडांगणावर, तेरवाड गंगापूर व गुरुदत्त साखर कारखाना येथे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हेलिपॅड तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. हेलिपॅडचे क्षेत्रफळ परिघ 102 मीटरचे आहे, त्याचा व्यास 15 मीटर आहे. या व्यासात 6 इंचापर्यंत खुदाई करून त्यामध्ये सिमेंट आणि खडीचे कोरडे काँक्रिट टाकून त्यावर रोलिंग करण्यात येणार आहे. दिशादर्शक पांढरे पट्टे मारून उदघोषणा कार्यरत करण्यात येणार आहे.

हेही वाचा

Back to top button