

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना फोडली, असा आरोप शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला, यानंतर आज पुन्हा जितेंद्र आव्हाड हे माझ्याकडे २०१४ मध्ये निरोप घेऊन आलेच नाहीत, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्या भेटीबाबत गौप्यस्फोट करत त्यांना इशारा दिला आहे.
केसरकर यांच्या आरोपांबाबत बोलताना आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले की, केसरकर मी आपल्या घरी आलो होतो, तो साहेबांचा निरोप घेऊन, की आघाडी धर्म पाळा. आपली जवळ-जवळ अर्धातास चर्चा झाली व आपण स्पष्ट शब्दांत जी भाषा वापरली, ती मी इथे लिहित नाही. पण, मी कुठल्याही परिस्थितीत मेलो तरी चालेल पण, राणेंचा प्रचार करणार नाही, असे सांगून आपल्या दोघांमधील संभाषण थांबले होते. त्यानंतर मी परत येऊन हाच निरोप शरद पवारांना दिला. पक्षामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहित आहे की, मी सांगितल्याशिवाय इतका मोठा निर्णय घेणार नाही. मुंबईवरुन येऊन सावंतवाडीमध्ये तुम्हाला निरोप द्यायला, इतका मोठा मी पक्षामध्ये नव्हतो. त्यामुळे मला पवारांनी निरोप दिला, हे सत्य लपवू नका.
त्यानंतर शरद कृषी भवनच्या उद्घाटनाला शरद पवार आले. आपण त्या कार्यक्रमाला आलात आणि त्यांच्या मागून चालण्याचा प्रयत्न केलात. पुढे सगळे कॅमेरावाले फोटो काढत होते, व्हिडीओ शुटींग करत होते. मी आपल्याला तिथे हटकले हे सत्य आहे. आणि तसेही ते मला सूचित करण्यात आले होते. म्हणून मी ते काम केले. कारण, त्या फोटोवरुन पुन्हा एकदा सिंधुदुर्गामध्ये गैरसमज निर्माण झाला असता. कारण आपण जे केले होते, ते उभ्या सिंधुदुर्गाला माहिती होते. आणि तुम्हाला तेच करायच होतं. जिल्ह्यात आणि महाराष्ट्रभर गैरसमज निर्माण करुन द्यायचे होते. तो मी नव्हेच, असे चित्र तुम्हाला सिंधुदुर्गामध्ये निर्माण करायचे होते. आपल्याला हटकल, आपल्याला बाजूला केलं याचे मला अजिबात दु:ख नाही. कारण, शरद पवारांचा निरोप धुडकावल्यानंतर तुम्हाला त्यांच्या बाजूला किंवा मागे चालण्याची गरजच नव्हती. त्यामुळे केलेल्या गोष्टीची मला खंत नाही. उगाच खोटा आव आणायचा होता. आणि तुम्हाला पक्ष सोडायचा होता. तुमचे ते आधीच ठरलेले होते. तुम्हाला फक्त कारण लागत होतं आणि ते कारण तुम्ही जितेंद्र आव्हाड यांच्यावर बिल फाडून मोकळे झालात.
हिंमत होती. तर राणेंचा प्रचार करणार नाही, मी या पक्षात राहणार नाही असा निर्णय का नाही घेतलात? अधिक इतिहासात मला जायला लावू नका. आज एवढे बोललो. याच्यानंतर परत तुमच्याबद्दल एक अवाक्षर ही काढणार नाही. कारण, सत्य सांगणं ही काळाची गरज होती. ते मी आज सांगितले.
उद्धव ठाकरेंबद्दल बोलाल तर खबरदार ही तुमची भूमिका कौतुकास्पद आहे. आपण त्यांना २०१४ साली भेटलात पण ज्या पवारांनी आपले आयुष्य घडविले. त्यांच्याबद्दल आपण जे बोललात ते न पटल्यामुळे मी आपल्या बद्दल बोललो. गेली ६-७ वर्ष आपण मला दोष देत होतात, मी लक्ष ही देत नव्हतो. जेव्हा तुम्ही साहेबांबद्दल बोललात तेव्हा मी उठलो .. साहेबांबद्दल बोलू नका … बस
हेही वाचलंत का ?