पूर व्यवस्थापनाचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा : राजेश क्षीरसागर

पूर व्यवस्थापनाचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा : राजेश क्षीरसागर
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भविष्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास कोणतीही अडचण भासू नये. यादृष्टीने पूर व्यवस्थापनासाठी सर्व विभागांना आवश्यक साधनसामग्री आणि उपाययोजनांचा समावेश असणारा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करा, अशा सूचना देऊन यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल, असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पूर व्यवस्थापन नियोजन आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, इचलकरंजी महानगरपालिकेचे प्रशासक सुधाकर देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

राजेश क्षीरसागर म्हणाले, अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील गडकोट, किल्ल्यांचे बुरुज ढासळून नुकसान होवू नये तसेच ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन व्हावे, यासाठी कायमस्वरुपी उपाय योजना कराव्यात. संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेवून धोकादायक इमारती, पूरबाधित क्षेत्रातील नागरिक, जनावरे व या भागातील रुग्णालयांमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे तात्काळ स्थलांतर करा. महामार्गावर पुराचे पाणी येवून वाहतुक खोळंबू नये, यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या सूचनांनुसार गतीने उपाय योजना राबवा.

पुराच्या पाण्यात बुडणारे विद्युत मीटर उंच ठिकाणी बसवून घ्या, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या समन्वयाने महानगरपालिका, जिल्हा परिषद, पाटबंधारे, बांधकाम व अन्य सर्व यंत्रणांनी पूर व्यवस्थापनासाठी चोख सुक्ष्म नियोजन केल्याबद्दल सर्व यंत्रणांचे कौतुक करुन पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी सर्वजण सतर्क राहूया, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी विविध विभागांचे नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. पूरप्रवण क्षेत्रांना भेटी देवून नागरिकांशी संवाद साधला आहे. यामुळे बऱ्याचशा भागातील नागरिक व जनावरांचे स्थलांतर करण्यात येत आहे. आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, पूरबाधित क्षेत्रातील धोकादायक इमारतीमधील नागरिक, येथील रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. मदत व पुनर्वसनासाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, पूरबाधित गावांमधील नागरिकांचे मागील वर्षी स्थलांतर केले होते. यावर्षीही संभाव्य पूरपरिस्थिती पाहता नियोजनबध्द कार्यवाही करण्यात येत आहे. आरोग्य सुविधा, प्रथमोपचारासाठी आरोग्य पथके, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, साफसफाई, आदींसाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार ड्रोन सर्व्हे करण्यात येणार आहे. पुरबाधित भागाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे.

इचलकरंजी महानगरपालिका प्रशासक सुधाकर देशमुख यांनी इचलकरंजी परिसरात करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. तर पोलीस प्रशासनाच्या तयारीची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, राष्ट्रीय महामार्ग विभाग, महावितरण, कृषी, आरोग्य आदी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनाची माहिती दिली.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news