एकनाथ शिंदेंकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया | पुढारी

एकनाथ शिंदेंकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडीशी भाजपचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते आज कोल्हापुरात आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. एकनाथ शिंदे यांच्याकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आला तर १३ जणांचा समिती बसून चर्चा करुन तो केंद्राला पाठवते. पण अद्याप प्रस्तावच आलेला नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

देशामध्ये अभिव्यत्ती स्वातंत्र्य आहे. पण शरद पवार आणि संजय राऊत यांना जरा जास्त आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीला जाणे नेहमीचे आहे. त्यांच्या दिल्ली दौऱ्यामागे विशेष काही कारण नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

गेलेत कोण, येणार आहेत कोण, पश्चाताप कोणाला होणार? याबाबत आपण अनज्ञिज्ञ आहे. चाललेल्या घटनांशी भाजपचा संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटाला आज आणखी काही आमदार येऊन मिळण्याची शक्यता आहे. यामुळे शिंदे गटातील समर्थक आमदारांची संख्या ५० च्या वर जाईल, अशी अटकळ बांधली जात असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. सध्या शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३७ आणि अपक्ष ९ आमदार आहेत.

शिवसेनेमध्ये मोठे बंड करून ४६ आमदारांससोबत गुवाहाटीला असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात राजकीय भूकंप आणला. या पार्श्वभूमीवर आज त्यांनी मोठा खुलासा केला असून यामध्ये अद्याप महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतलेला नाही असे स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे गटाची भूमिका चुकीची असून कायद्यप्रमाणे आम्ही भक्कम आहोत असा दावा त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

 हे ही वाचा :

Back to top button