

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेमध्ये मोठे बंड करून ४६ आमदारांससोबत गुवाहाटीला असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात राजकीय भूकंप आणला. या पार्श्वभूमीवर आज त्यांनी मोठा खुलासा केला असून यामध्ये अद्याप महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतलेला नाही असे स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे गटाची भूमिका चुकीची असून कायद्यप्रमाणे आम्ही भक्कम आहोत असा दावा त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.
काल (दि.२३) व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेल्या महाशक्तीबद्दल बोलताना शिंदे म्हणाले, बाळासाहेबांची महाशक्ती आमच्या पाठीशी असून त्याचाच उल्लेख काल केला मी होता. तसेच लोकशाहीमध्ये संख्याबळ महत्वाचे असून आमच्या सोबत अपक्ष आमदारांचा मोठा गट आहे. आम्ही शरद पवारांचा नेहमी आदर करतो, ते देशातले मोठे नेते असल्याचे सांगत शिंदे यांनी त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याचे टाळले. आमच्या कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून आज (दि.२४) आमदारांची बैठक घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या गटाला आज आणखी काही आमदार येऊन मिळण्याची शक्यता आहे. यामुळे शिंदे गटातील समर्थक आमदारांची संख्या ५० च्या वर जाईल, अशी अटकळ बांधली जात असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. सध्या शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३७ आणि अपक्ष ९ आमदार आहेत.
हे ही वाचा :