खासदार धैर्यशील मानेंच्या गोटातही चलबिचल, ‘मातोश्री’वर राहायचे की शिंदेंसोबत....? | पुढारी

खासदार धैर्यशील मानेंच्या गोटातही चलबिचल, ‘मातोश्री’वर राहायचे की शिंदेंसोबत....?

इचलकरंजी ; विठ्ठल बिरंजे : एकनाथ शिंदे यांच्या बंडात शिवसेनेतील मातब्बर सहभागी होऊ लागल्याने जिल्ह्यातील शिवसेनेत कमालीची अस्वस्थता असताना आता खासदार माने यांच्या गोटातही चलबिचल सुरू आहे. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने काय करणार, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत ‘मराठा आरक्षणाचे वादळ आणि भाजपची रसद’ या ताकदीवर धैर्यशील माने हे माने घराण्याचे तिसर्‍या पिढीचे प्रतिनिधी संसदेत पोहोचले. आपल्या वक्तृत्वाने त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांना आपलेसे केले. एकनाथ शिंदे यांनी त्यांना विकासकामांसाठी चांगली मदत केली. पाणी प्रश्नाबरोबरच इचलकरंजीला महापालिकेचा दर्जा देण्यासाठी माने यांच्या प्रयत्नाला एकनाथ शिंदे यांनी पाठबळ दिले. शिवसेनेत नवखे असूनही माने हे ठाकरे आणि शिंदे यांच्या जवळ गेले.

सध्याच्या राजकीय घडामोडीत सेनेच्या मातब्बर मंत्र्यांसह आमदारांनी शिंदे यांना साथ दिली आहे. भविष्यातील राजकीय जोडण्या खासदारांसाठी महत्त्वाच्या आहेत. माने यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याचे ठरविले आणि येणार्‍या काळात एकनाथ शिंदे व भाजप एकत्र आल्यास खासदारांची सर्वाधिक कोंडी होणार आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राजकीय चित्र पाहता सध्या तरी संघटनात्मक बांधणीच्या पातळीवर भारतीय जनता पार्टी मजबूत आहे. या तुलनेत शिवसेना कित्येत कोस दूर आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ज्या उमेदवाराला भाजपचा पाठिंबा तोच विजयापर्यंत पोहोचणार, असे मतदारसंघातील चित्र आहे. त्यामुळे धैर्यशील माने यांना ‘मातोश्री’वर राहायचे की शिंदे यांच्यासोबत जायचे, याबाबतचा निर्णय शक्य तितक्या लवकर घ्यावा लागणार आहे.

भाजपला लोकसभा महत्त्वाची

लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपची मतदारसंघात बांधणी सुरू आहे. लोकसभेसाठी भाजपकडे सध्या तरी या मतदारसंघात चेहरा नाही. राहुल आवाडे, सदाभाऊ खोत यांच्यापैकी एकाला पुढे केले जाऊ शकते. परंतु, त्यालाही मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे धैर्यशील माने हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत येणे हीसुद्धा भाजपची राजकीय गरज ठरू शकते. मात्र, धैर्यशील माने काय करतात, यावरच भाजपचे लोकसभेचे गणित अवलंबून आहे.

Back to top button