कोल्हापूर : राजकीय घडामोडींना वेग! आमदार प्रकाश आबिटकर ‘नॉटरिचेबल’ | पुढारी

कोल्हापूर : राजकीय घडामोडींना वेग! आमदार प्रकाश आबिटकर 'नॉटरिचेबल'

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : विधानपरिषद निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर राज्यामध्ये राजकीय भूकंप झाला आहे. काल रात्री विधान परिषद निवडणूक होताच शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या १५ समर्थक आमदारांसह नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, भुदरगड- राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर देखील ‘नॉटरिचेबल’ झाले आहेत.

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत हे स्पष्ट झाले नसले तरी जवळपास पंधरा आमदार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. सध्या संजय रायमुलकर, संजय गायकवाड, भरत गोगावले, बालाजी किणीकर, प्रकाश आबिटकर, संजय राठोड, ज्ञानराज चौगुले, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, रमेश बोरनारे, महेंद्र दळवी, शहाजी बापू पाटील, महेश शिंदे, विश्वनाथ भोईर, प्रदीप जयस्वाल या शिवसेना आमदारांचे फोन नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे हे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातला गेल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या दुपारी होणाऱ्या बैठकीमध्ये किती आमदार उपस्थित राहतात हे स्पष्ट होईल.

मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्याचे आता स्पष्ट झाले असून, ते आपल्या समर्थक आमदारांसह सुरतमधील ली मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

सुरत हा भाजपचा गड मानला जातो. या गडामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना ठेवण्यात आले आहे. दरम्यान, ठाण्यातील त्यांचे समर्थक एकनाथ शिंदे हे राज्यभर मेहनत घेत असताना त्यांना आधी उपमुख्यमंत्री आणि नंतर मुख्यमंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आले. सरकारमध्येही त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत होता, त्यामुळे ते नाराज होते अस सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी, शिवसेनेत आपल्याला किंमत दिली जात नाही, आपण डिस्टर्ब आहोत, असे सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांना फोनवर सुनावले होते. त्यानंतर त्यांनी त्यांनी आपला फोन बंद करून ते सुरतकडे निघाले. तर दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांना लोअर परेल येथील सेंट रेगीस या हॉटेलमध्ये सोमवारी रात्री ठेवले आहे.

हे ही वाचा :

Back to top button