प्रवीण दरेकरांसाठीच पंकज मुंडेंना उमेदवारी नाकारली : आमदार अनिल गोटे | पुढारी

प्रवीण दरेकरांसाठीच पंकज मुंडेंना उमेदवारी नाकारली : आमदार अनिल गोटे

धुळे; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या उमेदवारीतून राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना डावलल्यानंतर धुळ्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी भारतीय जनता पार्टीवर शरसंधान साधले आहे. विधान परिषदेत पंकजा मुंडे आल्या असत्या तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना संधी मिळाली नसती. त्यामुळेच पंकजाचा पत्ता कट करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप गोटे यांनी केला. पंकजा यांच्यावर झालेल्या अन्यायाचे आश्चर्य वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पार्टीने विधान परिषदेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर यातून माजी मंत्री पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली नसल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे धुळ्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या वारस असणाऱ्या पंकजा मुंडे यांना आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रतिष्ठेचे स्थान मिळेल, अशी शक्यता नसल्याचे गोटे यांनी म्हटलं आहे.

भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांपासून राज्यांच्या नेत्यांपर्यंत सर्वांचे एकच धोरण आहे. मास लीडरला जमीनदोस्त करण्याचे त्यांचे धोरण असून स्वतःच्या प्रयत्नांनी उभे राहणाऱ्या नेत्यांना जमीनदोस्त केले जाते आहे. तीन चाकी गाडी घेऊन फिरणाऱ्या लहान मुलांप्रमाणेच भारतीय जनता पार्टीला त्यांचा आधाराची गाडी घेऊन वाटचाल करणारे नेते अपेक्षित असल्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे आता उमेदवारीची यादी पाहिली असता यात कुणीही मास लीडर नसून सर्व वडाच्या झाडावरची बांडगुळ आहेत, असा आरोपही गोटे यांनी केला.

भारतीय जनता पार्टीमध्ये खोटे आणि पाठीत खंजीर खुपसन्याची कला अवगत असणारे नेते असून अन्य पक्षात असे नेते सापडणार नाही, असा टोलाही त्‍यांनी लगावला.  पंकजा यांना डावलल्यानंतर या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी प्रयत्न कुठे केले ते सांगावे. विधान परिषद कशासाठी आहे? याची मला माहिती असून पंकजा या विधान परिषदेमध्ये आल्या असत्या तर प्रवीण दरेकर हे विरोधी पक्ष नेते राहणार नव्हते. त्यामुळेच पंकजा यांचा पत्ता कट झाल्याचा आरोप गोटे यांनी केला.

हेही वाचलंत का?

Back to top button