‘माझी वसुंधरा’ अभियानात पन्हाळा नगरपरिषद पुणे विभागात प्रथम तर राज्यात चौथी
पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : गेले सलग चार वर्षे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या पन्हाळा नगरपरिषदने महाराष्ट्र राज्य शासनाच्या "माझी वसुंधरा अभियान 2.0" मध्ये उत्तुंग यश मिळवत राज्यात चौथा क्रमांक मिळवला तर पुणे विभागात प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे. आज दिनांक ५ जून रोजी पर्यावरण दिनाचे औचित्त्य साधून मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात पन्हाळा नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी स्वरूप खारगे व स्वच्छता मुकादम जयवंत कांबळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पन्हाळा नगरपरिषद : पर्यावरण रक्षण व संवर्धन साठी उपक्रम
राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फ़त "माझी वसुंधरा" हे पर्यावरण रक्षण व संवर्धन साठीचे अभियान सुरू करण्यात आले आहे. राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा व ग्रामपंचायती यांनी या अभियानात सहभाग नोंदवला होता. पर्यावरण रक्षण व संवर्धन संदर्भात केलेल्या कामगिरीच्या आधारे हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
पन्हाळा नगरपरिषद मार्फत शहरात विविध ठिकाणी हरित क्षेत्र, उद्याने तयार करण्यात आलेली आहेत. शहरात स्वच्छतेसोबतच सोलार पथ दिवे, अनेक इमारतींवर सोलर यंत्रणा, पाण्याचे संवर्धन, ई-रिक्षा द्वारे जनजागृती, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन, सायकल ट्रॅक, विविध जनजागृतीचे कार्यक्रम, शहरातील वॉटर ऑडिट व एनर्जी ऑडिट अशी अनेक कामे व उपक्रम राबविण्यात आल्यामुळे शहरास हा पुरस्कार प्राप्त झाल्याची माहिती नगरपरिषदचे मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी दिली. तसेच शहरातील सर्व नागरिक , सर्व सफाई मित्र व नगरपरिषदचे कर्मचारी यांच्या मेहनतीचे हे फळ मिळाले असून हा शहराचा सन्मान असल्याचे श्री. खारगे म्हणाले.
विशेष म्हणजे नगरपरिषद चे प्रशासक खारगे यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुकादम जयवंत कांबळे यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर नेल्याचे सर्वत्र कौतुक झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आस्थेने या कर्मचाऱ्यांची विचारपूस करून शुभेच्छा दिल्या.
हेही वाचलंत का ?