नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
जैवविविधता आणि वन्यजीवांसंदर्भात केंद्र सरकार ज्या पध्दतीने धोरणे राबवित आहे, त्यामुळे वन्यजीवांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे, असे स्पष्ट करत निर्धारित वेळे आधीच पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
'जमीन वाचवा आंदोलन' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, जैवविविधता आणि वन्यजीवांसंदर्भातील सरकारच्या धोरणांमुळे वाघ, बिबटे आणि हत्तींसह इतर वन्यजीवांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जैवविविधतेला सरकारने खूप महत्त्व दिले आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावरील गावांमध्ये नैसर्गिक शेतीसाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूद हे त्याचे ताजे उदाहरण आहे.
आज देशात पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. निर्धारित वेळेच्या पाच महिने आधी हे उद्दिष्ट साध्य झाले आहे. पर्यावरण रक्षणासाठी देशात व्यापक प्रयत्न सुरू आहेत. जागतिक वातावरण बदलात भारताची फारशी भूमिका नाही, मात्र तरीही भारत पर्यावरण संवर्धनासाठी गंभीरतेने काम करीत आहे.
जगातील विकसित आणि आधुनिक देश नैसर्गिक साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त वापर करीत आहेत, शिवाय कार्बन उत्सर्जनात त्यांचा मोठा वाटा आहे. अशावेळी भारताला पर्यावरण रक्षणासाठी भारताने दक्ष राहणे आवश्यक आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, जमीन रसायनमुक्त ठेवणे, त्यातील जीव-जंतू टिकवणे, जमिनीतील ओलावा कायम ठेवून भूजल पातळी वाढविणे, जमिनीची धूप रोखणे या क्षेत्रात काम करणे गरजेचे आहे. आधी शेतकऱ्यांना आपली जमीन कशा प्रकारची आहे, ते माहित नसायचे. ही त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने सॉईल कार्डची योजना राबविली. 'कॅच द रेन' अभियान सर्वव्यापी बनविले जात आहे. मार्च २०२१ पासून १३ मोठ्या नद्यांतील प्रदूषण कमी करण्याबरोबरच नदीकिनारी झाडे लावण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.
हेही वाचा :