संभाजीराजे आणि सेनेच्या विषयांत भाजपनं चोंबडेपणा करु नये, संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया | पुढारी

संभाजीराजे आणि सेनेच्या विषयांत भाजपनं चोंबडेपणा करु नये, संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन

संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ”तुम्हाला राजकारणामध्ये करियर करायचे असेल तर कोणत्या तरी पक्षाचा हात धरावा लागतो. संभाजीराजे यांच्याबाबत आमच्या पक्षाचा निर्णय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला.” अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. विरोधासाठी विरोध ही सध्याची विरोधी पक्षाची भूमिका आहे. संभाजीराजे आणि सेनेच्या विषयांत भाजपनं चोंबडेपणा करु नये, असा टोला त्यांनी लगावला आहे.

राज्यसभेच्या दोन जागा शिवसेनेच्या आहेत. शिवसेनेचा उमेदवार तेथे आणायचा हे आधीचं ठरलं आहे. दोन्ही जागा निवडून येण्यासाठी आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ आहे. संभाजीराजेंनी काल मन मोकळं केले आहे. आमचा पक्ष, आमच्या पक्षाच्या निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला. राजकारणामध्ये करियर करायचे असेल तर राजेंना कोणत्या तरी पक्षाचा हात धरावा लागतो. जयपूरच्या राजघराण्याचे राजकीय लागेबांधे आहेत, असे राऊत यांनी संभाजीराजेंना उद्देशून म्हटले आहे.

छत्रपतींच्या गादीवर प्रेम आणि अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाच्या मालकीचे नाहीत. ते संपूर्ण देशाचे आणि विश्वाचे आहेत. चंद्रकांत पाटील काय छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का? असा सवाल करत राऊत यांनी संभाजीराजेंचा विषय आमच्यासाठी संपला असल्याचा पुनरुच्चार केला.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. यातून त्यांना काय आसुरी आनंद मिळत आहे माहित नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

संजय राऊत दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, आगामी निवडणुकीसाठी पक्षाची बांधणी करणे, कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे सुरु आहे. त्यासाठी शिवसंपर्क मोहीम सुरु आहे. कोकण असो वा मराठवाडा प्रत्येक ठिकाणी जाऊन शिवसेनेचे नेते जाऊन संवाद साधत आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्याविषयी लोकांच्या मनात आदर, आस्था आहे.

राज्यसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द फिरवला. आमच्यात राज्यसभा निवडणूक शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून लढविण्याचे ठरले आणि उमेदवारीसह सगळ्या गोष्टींवर शिक्‍कामोर्तबही झाले होते. मात्र, त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी शब्द का मोडला हे कळत नाही, असा संताप संभाजीराजे यांनी शुक्रवारी व्यक्‍त केला होता.

या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुरेशा आमदारांच्या सह्या माझ्याकडे आहेत आणि निवडून येण्याइतपत पाठबळही आहे. मात्र निवडणुकीत होणारा घोडेबाजार टाळण्यासाठी ही निवडणूक मी लढविणार नाही, अशी घोषणाही त्यांनी केली.

हे ही वाचा :

Back to top button