मुख्यमंत्री ठाकरेंनी शब्द फिरविला : संभाजीराजे | पुढारी

मुख्यमंत्री ठाकरेंनी शब्द फिरविला : संभाजीराजे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यसभा निवडणुकीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द फिरवला. आमच्यात राज्यसभा निवडणूक शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून लढविण्याचे ठरले आणि उमेदवारीसह सगळ्या गोष्टींवर शिक्‍कामोर्तबही झाले होते. मात्र, त्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी शब्द का मोडला हे कळत नाही, असा संताप संभाजीराजे यांनी शुक्रवारी व्यक्‍त केला.

या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुरेशा आमदारांच्या सह्या माझ्याकडे आहेत आणि निवडून येण्याइतपत पाठबळही आहे. मात्र निवडणुकीत होणारा घोडेबाजार टाळण्यासाठी ही निवडणूक मी लढविणार नाही, अशी घोषणाही त्यांनी केली.
मुंबईत पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी आपली भूमिका जाहीर केली. उद्धव ठाकरे असे का वागले, या गोष्टीचे मला प्रचंड वाईट वाटत आहे, असे सांगून संभाजीराजे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझ्यात काय संभाषण झाले, हे मला जाहीर करायचे नव्हते. पण मला आज बोलावे लागतेय. मी सांगतोय, त्यापैकी एकही शब्द खोटा असेल तर मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवछत्रपतींच्या  कोणत्याही स्मारकावर किंवा पुतळ्याजवळ यायला तयार आहे. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभे राहून उद्धव ठाकरे यांनी शपथेवर सांगावे की, मी खोटं बोलतोय म्हणून.

ठाकरे यांनी सुरुवातीला मला भेटण्यासाठी दोन खासदारांना पाठवले होते. मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये आमची बैठक झाली होती. त्यावेळी मी शिवसेनेत प्रवेश करावा, असा प्रस्ताव खासदारांनी मांडला. तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. मी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणूनच लढणार, असे त्यांना सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला वर्षा बंगल्यावर भेटायला बोलावले. मी मुख्यमंत्रिपदाचा मान राखून त्यांना भेटायला गेलो. त्यांनी मला छत्रपती आमच्यासोबत हवेत, अशी इच्छा व्यक्‍त केली. तेव्हादेखील मी अपक्ष म्हणून लढणार यावर ठाम होतो.

त्यानंतर मी उद्धव ठाकरे यांच्यासमोर महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून लढायची तयारी दर्शविली. पण उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, ते शक्य होणार नाही. त्याऐवजी तुम्ही शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीचे उमेदवार व्हा, असे त्यांनी मला सांगितले.

याबाबतचा घटनाक्रम कथन करताना संभाजीराजे सांगू लागले… दोन दिवस उलटल्यानंतर शिवसेनेच्या एका मंत्र्याचा फोन आला. त्यानंतर शिवसेनेच्या एका मंत्र्याच्या घरी आमची बैठक झाली. त्या बैठकीत एक ड्राफ्ट तयार करण्यात आला. त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि माझ्या सूचनांचा समावेश होता. तो ड्राफ्ट आजही माझ्या मोबाईलमध्ये आहे. यानंतर मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये पुन्हा एकदा बैठक झाली. तेव्हा एक मंत्री, त्यांचे स्नेही आणि शिवसेनेचा एक खासदार मला भेटायला आले. तेव्हा शिवसेना मंत्र्याच्या स्नेह्याने मला पुन्हा एकदा पक्षात प्रवेश करण्याविषयी विचारले. तेव्हादेखील मी त्यांना स्पष्टपणे प्रवेश करण्यास नकार दिला. त्यानंतर हा विषय तिथेच थांबवून राज्यसभेच्या उमेदवारीबाबतच्या ड्राफ्टचे वाचन करून काही बदल केले.

सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर मी निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे घेण्यासाठी कोल्हापूरकडे निघालो तर अचानक प्रसारमाध्यमांवर संभाजीराजे वर्षा बंगल्यावर येऊन शिवबंधन बांधावे, उद्या प्रवेश होणार, अशा बातम्या झळकू लागल्या. त्या बातम्या पाहून मला धक्‍का बसला. यावर मी शिवसेनेच्या मंत्र्याला फोन करून विचारणा केली. पण ते याबद्दल काहीच बोलले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नंतर माझा फोनच उचलला नाही. यानंतर कोल्हापुरातील संजय पवार यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मी आधीही खासदार होतो. पण झाल्या प्रकाराबद्दल मला इतकेच वाईट वाटते की, मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांनी मला दिलेला शब्द मोडला, अशी खंत संभाजीराजे यांनी व्यक्‍त केली.

सगळ्या पक्षांचा आमदारांवर दबाव होता 

माझ्याकडे राज्यसभेसाठी अर्ज भरता येईल एवढ्या आमदारांच्या अर्जावर सह्या आहेत आणि निवडणूक जिंकता येईल एवढ्या आमदारांचा पाठिंबाही होता. पण सगळ्या पक्षांच्या आमदारांवर पाठिंबा देऊ नये म्हणून दबाव होता. आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण आमच्यावर दबाव आहे. असे अनेक आमदार म्हणाले, असे सांगून संभाजीराजे म्हणाले, अनेक आमदारांनी अनुमोदन म्हणून मला सह्या दिल्या. पण नावे उघडू करू नये, अशी त्या आमदारांची इच्छा आहे. पण ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या, त्यांच्यासाठी मी ठामपणे उभा राहीन, त्यांनी कधीही हाक मारावी, छत्रपती त्याच्या सेवेसाठी हजर राहणार. त्याचवेळी मी आता लढलो तर घोडेबाजार सुरू होईल आणि ते बरोबर होणार नाही, म्हणून मी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी सांगितले.

मला कुठल्याही पक्षाशी द्वेष नाही. प्रत्येकाचा अजेंडा वेगळा आहे, मी त्यांचा आदर करतो. लोकशाही आहे ही. पण मलाच त्यात अडकायचे नाही. उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही म्हणूनही मी द्वेष ठेवणार नाही, असे संभाजीराजे म्हणाले. तुम्ही शिवसेनेत जाण्याचे का टाळले? शिवसेना तुम्हाला अस्पृश्य आहे का, असा सवाल पत्रकारांनी त्यांना केला. अस्पृश्य हा शब्द शाहू महाराजांनीच घालवला आहे. हा शब्द चुकीचा आहे. शिवसेनेचा जसा अजेंडा आहे तसा माझाही अजेंडा आहे. त्यामुळे मला कोणत्या पक्षात जायचे नव्हते, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

ही माघार नाही, हा स्वाभिमान!
माझ्यासाठी खासदारकी महत्त्वाची नाही. उद्धव ठाकरेंनी ती दिलीच होती. पण माझ्यासाठी माझी जनता महत्त्वाची आहे. माझा विचार महत्त्वाचा आहे. स्वाभिमानाने जगणारा संभाजी छत्रपती कोणासमोर झुकून खासदारकी घेणार नाही, ही माझी भूमिका आहे. उलट मला खासदारकी नाकारून त्यांनी मला मोकळे केले आहे. आता विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी आणि स्वराज्य जमविण्यासाठी मी सज्ज झालो आहे, असा इशाराही यावेळी संभाजीराजे यांनी दिला.

भाजपशी चर्चा नाही
भाजप राज्यसभा निवडणुकीत पक्षाचा तिसरा उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे, भाजपकडून काही ऑफर आहे का, असे विचारले असता ‘याबाबत आपली कोणाशीही चर्चा झालेली नाही, तसेच भाजपनेही काही चर्चा केलेली नाही’, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

Back to top button