Sambhajiraje : राज्यसभेसाठी संभाजीराजेंकडून अपक्ष उमेदवारी जाहीर; सर्व विधानसभा आमदारांना खुले पत्र | पुढारी

Sambhajiraje : राज्यसभेसाठी संभाजीराजेंकडून अपक्ष उमेदवारी जाहीर; सर्व विधानसभा आमदारांना खुले पत्र

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातून राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे माजी खासदार संभाजीराजें छत्रपतींनी (Sambhajiraje) पत्रकातून जाहीर केले आहे. या जागेवरती अपक्ष म्हणून मला संधी देण्यात यावी, याकरिता मला आपणा सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे, असे आवाहन त्यांनी सर्व राजकीय पक्षांना व अपक्ष आमदारांना केले आहे.

पत्रकामध्ये संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी म्हटले आहे, महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारास विधानसभा सदस्यांच्या ४२ मतांची आवश्यकता असते. महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार करता, या सहा जागांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी एक व भाजपला दोन जागांवरती विजय मिळविणे शक्य वाटते. उर्वरित एक जागेकरिता कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे या रिक्त पदाच्या लढतीकरिता सर्व आमदारांनी मदत करावी असे आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे.

पत्राद्वारे संभाजीराजे (Sambhajiraje) असे म्हणतात २००७ पासून सामाजिक चळवळींच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात मी कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेली शिकवण आचरण करीत मी राजकारण विरहित कार्य करीत आलो आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदार असताना देखील कोणत्याही बाबतीत भूमिका घेताना वैयक्तिक राजकीय भवितव्याचा विचार न करता, सदैव समाजाला दिशा देण्याचीच भूमिका घेतली. संसदेत काम करीत असताना महाराष्ट्राच्या व देशाच्या हितासाठी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पक्षविरहित काम केले.

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संतांच्या विचारांची बैठक असणारा हा महाराष्ट्र या विचारांवरून ढळू नये, यासाठी रस्त्यापासून ते संसदेपर्यंत मी झटत राहिलो. जनकल्याणालाच नेहमी व एकमेव प्राधान्य दिले. मात्र लोकहीताची कामे करण्याकरिता सत्तापद हाती असणे हे किती सोयीस्कर असते, हे खासदारकीच्या कारकिर्दीत लक्षात आले. यामुळे राज्यसभेच्या या सहाव्या जागेवर मी दावा करत आहे. असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

 

हेही वाचा

Back to top button