कोल्हापूर : मांगुरवाडी येथील खून प्रकरणी आरोपी महिलेला पोलिस कोठडी | पुढारी

कोल्हापूर : मांगुरवाडी येथील खून प्रकरणी आरोपी महिलेला पोलिस कोठडी

सरुड (ता. शाहूवाडी), पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील नांदगाव पैकी मांगुरवाडी येथे झालेल्या प्रकाश पांडुरंग कांबळे खून प्रकरणी संशयित आरोपी वंदना प्रकाश कांबळे हिला जिल्हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. बी. पाटील यांनी २२ मे पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयीत आरोपी महिला ही मृत प्रकाश कांबळेची पत्नी असून अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पत्नी वंदना हिने जांभा दगडावर डोके आपटून आणि गळा आवळून पती प्रकाश कांबळे याचा खून केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली होती. रात्री आरोपीला अटक करून मंगळवारी दुपारी जिल्हा न्यायालयात हजर केल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली.

पतीने आत्महत्या केल्याचे भासविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी वंदना हिला शाहूवाडी पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा काही तासात उघडकीस आणला आणि तिला सोमवारी रात्री अटक केली होती. तर मृत प्रकाश याचे गुप्तांग कापल्याचे मृतदेहाच्या वैद्यकीय शवविच्छेदन अहवालातून समोर आले होते. परिक्षाविधीन सहायक पोलिस उपनिरीक्षक सचिन पांढरे, पोलिस नाईक श्रीकांत दाभोळकर, सचिन कुंभार, शहाजी भोसले यांनी संशयित आरोपी वंदना कांबळे हिला मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कोल्हापूर येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. बी. पाटील यांनी पोलिसांचे निवेदन स्वीकारत आरोपीला २२ मे पर्यंत पोलिस कस्टडी सुनावली आहे.

आरोपीने गुन्ह्यात वापरलेले शस्त्र तसेच महत्वाचे पुरावे तसेच माहिती गोळा करण्याच्या अनुषंगाने आरोपीला अधिकाधिक पोलिस कस्टडी देण्याची पोलिसांनी न्यायालयाला विनंती केली. दरम्यान, खुनाच्या घटनेच्या तपासासाठी शाहूवाडी पोलिसांचे एक पथक नांदगाव परिसरात गेल्याची माहितीही पोलिस निरीक्षक पाटील यांनी दिली.

Back to top button