अलिबाग : टुरिस्ट कॉटेजमध्ये आढळले पुण्यातील चौघांचे मृतदेह | पुढारी

अलिबाग : टुरिस्ट कॉटेजमध्ये आढळले पुण्यातील चौघांचे मृतदेह

अलिबाग ; पुढारी वृत्तसेवा : अलिबाग शहरातील मध्यवर्ती परिसरातील एका टुरिस्ट कॉटेजमध्ये पर्यटक म्हणून मुक्कामी आलेल्या चौघांचे मृतदेह आढळून आले. कुणाल गायकवाड (वय २९), प्रियांका इंगळे (वय २५) ३ वर्षांचा मुलगा आणि ५ वर्षांची मुलगी (सर्व रा. शिक्रापूर, जि. पुणे) अशी मृतांची नांवे आहेत. दोन लहान मुलांची हत्या करुन कुणाल गायकवाड व प्रियांका इंगळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी तपासाअंती काढला आहे. या घटनेमुळे अलिबाग शहरात खळबळ उडाली आहे.

चौघे जण बुधवार (दि. ११) टूरिस्ट कॉटेजमध्ये मुक्कामी आले होते. आज (मंगळवार) सकाळपासून हे चौघे राहत असलेल्या रुमचा दरवाजा त्यांनी उघडला नाही, म्हणून कॉटेज मालकांनी दुपारी चारच्या सुमारास दरवाजा उघडून पाहिले. यावेळी मुलगा व मुलीचा मृतदेह बेडवर पडलेला आढळून आला. तर कुणाल गायकवाड व  प्रियांका इंगळे यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. कॉटेज मालकांनी तत्काळ अलिबाग पोलिसांना याबाबत माहिती दिली. अलिबागचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी आपल्या सहकार्यासह तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपासास प्रारंभ केला.

जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी सांगितले की, मृत चौघेही पुणे ग्रामीण क्षेत्रातील शिक्रापूर येथील रहिवासी आहेत. कुणाल गायकवाड व  प्रियांका इंगळे हे हरवले (मीसींग) असल्याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात २ मेरोजी तक्रारी दाखल केल्याची माहिती गायकवाड आणि इंगळे कुंटुंबियांनी दिली आहे. त्यामुळे पुढील तपासात आता शिक्रापूर पोलिसांची देखील मदत घेण्यात येत असल्याचे दूधे यांनी सांगितले.

मृत कुणाल गायकवाड हा वीज वितरण कंपनीत नोकरी करत होता. तर मृत  प्रियांका इंगळे ही गृहिणी होती. दरम्यान, चारही मृतदेह उत्तरिय वैद्यकीय तपासणीकरिता येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर काही धागेदोरे तपासाच्या दृष्टीने प्राप्त होतील, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button