कोल्हापूर जिल्हा परिषदेत पदाधिकारी नसतानाही बदल्यांचा ‘बाजार’ | पुढारी

कोल्हापूर जिल्हा परिषदेत पदाधिकारी नसतानाही बदल्यांचा ‘बाजार’

कोल्हापूर; विकास कांबळे : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या हा पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात नेहमीच वादाचा विषय बनत असतो. यामध्ये प्रशासनापेक्षा पदाधिकार्‍यांचीच अधिक बदनामी व्हायची. यावेळी जिल्हा परिषदेत पदाधिकारी नसल्यामुळे कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये होणार्‍या उलटसुलट चर्चेला पूर्णविराम मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. परंतु पदाधिकार्‍यांच्या अनुपस्थितीतही बदल्यांचा मोठा बाजार सध्या जिल्हा परिषदेत भरल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे प्रशासनातील खाबुगिरी चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे दोन वर्षे बदल्या थांबल्या होत्या. यावर्षी सर्व शासकीय कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेमध्ये देखील त्याची प्रक्रिया सुरू आहे. बदल्यांचा काळ म्हणजे जि. प. पदाधिकारी, सदस्य यांच्यासाठी सुगीचा काळ मानला जातो. सोयीच्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी कर्मचारी पदाधिकारी किंवा सदस्यांच्या मागे लागत असत. परंतु एकाच जागेवर दोन पदाधिकार्‍यांचा आग्रह असल्यास प्रशासनाची अडचण होत असे. यातून वादाचे प्रसंग घडत असत.

जि. प.च्या सभागृहाची मुदत मार्च महिन्यात संपली असून सध्या प्रशासक आहे. त्यामुळे यावेळी बदल्यांमध्ये जि. प. पदाधिकार्‍यांच्या हस्तक्षेपाचा प्रश्नच येत नसल्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये देखील बदल्यांची प्रक्रिया पारदर्शी होईल, असे बोलले जात होते. पदाधिकारी नसल्यामुळे प्रशासनाला देखील पारदर्शीपणे बदल्यांची प्रक्रिया राबवून एक आदर्श निर्माण करण्याची संधी होती. परंतु या ठिकाणी कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार कर्मचार्‍यांना पहावयास मिळत आहे.

जि. प. कर्मचार्‍यांच्या बदल्यांसाठी दि. 18 व 19 मे रोजी कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. परंतु तो दोन दिवस पुढे ढकलण्यात आला. दि. 20 व 21 मे रोजी बदल्या होणार आहेत. मात्र नियमित बदल्यांमध्ये आपल्या बगलबच्च्यांना सोयीचे ठिकाण मिळणार नाही, अशी भीती वाटल्यामुळे चार दिवस अगोदरच काही कर्मचार्‍यांच्या बदल्या प्रशासकांच्या कारकीर्दीत झाल्या आहेत.

‘त्यांना’ संधी मिळण्यासाठी बदल्यांसाठी मुदतवाढ

प्रशासकीय बदल्यांची मुदत दोन दिवस वाढवण्यात आली आहे. मुंबईतील बैठकीचे कारण देऊन ही मुदत वाढवण्यात आल्याचे प्रशासन सांगते. परंतु सामान्य प्रशासन विभागात प्रशासकांच्या काळात नव्याने बसवण्यात आलेल्या ‘कलेक्टर’ला संधी मिळावी, चर्चेला थोडे दिवस मिळावेत यासाठीच ही मुदत वाढविण्यात आल्याचे बोलले जाते.

200 कर्मचार्‍यांच्या बदल्या होण्याची शक्यता

जिल्हा परिषद मुख्यालयात साधारणपणे 400 ते 450 कर्मचारी आहेत. यातील दहा टकके कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय बदल्या होणार आहेत. प्रशासकीय बदलीमध्ये सोयीचे ठिकाण मिळेलच याची खात्री नसल्यामुळे वशिला असणारी मंडळी नियमातील पळवाटा शोधत बदल्या करून घेत असल्यामुळे प्रशासकीय बदलीस पात्र असणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या 10 टक्क्यांपेक्षा कमी असते. विनंती बदलीसाठी मात्र धडपड सुरू असते. यावेळी विनंती आणि प्रशासकीय अशा मिळून 200 कर्मचार्‍यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे.

Back to top button