अक्षर पटेल याचा खास विक्रम, अशी कामगिरी करणारा चौथा अष्टपैलू खेळाडू | पुढारी

अक्षर पटेल याचा खास विक्रम, अशी कामगिरी करणारा चौथा अष्टपैलू खेळाडू

मुंबई ; वृत्तसंस्था : यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार्‍या अक्षर पटेलने एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. अक्षर पटेल हा आता आयपीएलमध्ये 1000 हून अधिक धावा आणि 100 हून अधिक विकेटस् घेणारा जगातील चौथा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे.

नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सोमवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या लढतीत दिल्लीने 17 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात दिल्लीच्या अक्षरने नाबाद 17 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली; शिवाय ऋषी धवनची विकेटही घेतली.

आयपीएलमध्ये एक हजारहून अधिक धावा व 100 हून अधिक बळी अशी कामगिरी अक्षरच्या आधी केवळ तीनच खेळाडूंना करता आली आहे. त्यात रवींद्र जडेजा हा एकमेव भारतीय आहे. वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो आणि सुनील नारायण यांनीदेखील अशी कामगिरी केली आहे. ब्राव्होने 1560 धावा करून 183 बळी घेतले असून, सुनील नारायणने 1004 धावा करतानाच 152 गड्यांना तंबूत पाठवले आहे.

आजवर अक्षर पटेल याने आयपीएलमध्ये 121 सामने खेळले आहेत. त्यातील 87 डावांत त्याने 18.92 च्या सरासरीने 1116 धावा केल्या आहेत. 44 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. याशिवाय त्याने 121 सामन्यांतील 120 डावांत 101 गडी टिपले आहेत. 21 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी होय.

 

Back to top button