काेल्‍हापूर : दुहेरी खुनाचा प्रयत्‍न; लक्षतीर्थ वसाहतीमधील विजय उर्फ रिंकू देसाईसह १२ साथीदारांवर गुन्हा

काेल्‍हापूर : दुहेरी खुनाचा प्रयत्‍न; लक्षतीर्थ वसाहतीमधील विजय उर्फ रिंकू देसाईसह १२ साथीदारांवर गुन्हा

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा

राजकीय वर्चस्ववादातून लक्षतीर्थ वसाहत येथील सासणे कॉलनीत सोमवारी रात्री उशिरा दाेघांवर प्राणघातक हल्‍ला झाला हाेता.  या प्रकरणी बोंद्रेनगर येथील विजय उर्फ रिंकु देसाई याच्यासह बारा साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. संशयित हल्लेखोरांना अटक करण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून शोध मोहीम सुरू केली. बोंद्रेनगर, फुलेवाडी परिसरात ठिकाणी छापे टाकण्यात आले.

तलवार, कोयता, लोखंडी गज काठ्यांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात संतोष बोडके आणि कृष्णात बोडेकर (राहणार लक्षतीर्थ वसाहत) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी संतोष बोडके यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी सांगितले.

गुन्हे दाखल झालेल्या हल्लेखोरांत विजय उर्फ रिंकु देसाई, प्रकाश बोडके, रामचंद्र बोडके, तानाजी फले, लक्ष्मण बोडेकर, तानाजी शेळके, नितीन वरेकर, प्रथमेश जानकर, सागर बोडेकर, सुनील बोडके, चंद्र बोडके, (सर्व रा.बोंद्रेनगर) यांचा समावेश आहे.
या सर्वांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, बेकायदा जमाव करून दहशत माजवणे, धारदार शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी दिली.

विजय उर्फ रिंकू देसाई याचा सोमवारी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्ताने बोंद्रे नगर फुलेवाडीत डिजिटल फलक लावण्यास हल्लेखोराने कृष्णात बोडेकर व संतोष बोडके यांना सांगितले होते. डिजिटल फलक न लावल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील अशीही त्याने धमकी दिली होती.

जखमी संतोष बोडके व कृष्णात बोडेकर यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संतोष बोडके यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. कृष्णात बोडेकर यांनी हल्लेखोरांविरूध्द फिर्याद दिली आहे. या घटनेनंतर लक्षतीर्थ वसाहत, सासने कॉलनी परिसरात मंगळवारी दुसऱ्या दिवशीही तणाव कायम आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news