Gyanvapi controversy : काशीतील ज्ञानवापी मशिदीचा वाद आहे तरी काय?, जाणून घ्या १२ मुद्दे | पुढारी

Gyanvapi controversy : काशीतील ज्ञानवापी मशिदीचा वाद आहे तरी काय?, जाणून घ्या १२ मुद्दे

वाराणसी : वृत्तसंस्था

Gyanvapi controversy : न्यायालयाने नियुक्त केलेल्या सर्व्हे पथकाला सोमवारी ज्ञानवापी मशीद परिसरात शिवलिंग आढळले. शिवलिंग आढळलेली जागा सील करण्याचे तसेच तेथे सुरक्षा पुरविण्याचे आदेश वाराणसी न्यायालयाने जिल्हाधिकार्‍यांसह पोलिस आयुक्त, सीआरपीएफ कमांडंट यांना दिले. तेथे कुणालाही प्रवेश देण्यात येऊ नये. आहे त्या स्थितीत शिवलिंग सुरक्षित राहावे, असे न्यायालयाने म्हटले असून, याची जबाबदारी या अधिकार्‍यांवर सोपविली आहे.

घोरी, लोदीच्या विध्वंसापासून ते अहिल्यादेवींच्या जीर्णोद्धारापर्यंत

काशी विश्वनाथ मंदिर हे भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या मंदिराचा उल्लेख स्कंद पुराणातूनही आलेला आहे. मूळ विश्वनाथ मंदिर 1194 मध्ये मोहम्मद घोरीचा सेनापती व नंतरचा सुलतान कुतुबुद्दीन ऐबक याने उद्ध्वस्त केले होते.

सन 1230 मध्ये गुजरातेतील एका व्यापार्‍याने त्याची पुनर्उभारणी केली. पुन्हा 1447-1458 दरम्यान हुसैन शाह शरिकी याने व नंतर 1489-1517 दरम्यान सिकंदर लोदी याने हे मंदिर उद्ध्वस्त केले. एका माहितीनुसार, 1585 मध्ये अकबराचा अर्थमंत्री राजा तोडरमल याने मंदिराची पुनर्उभारणी केली.

विश्वनाथाचे आजचे मंदिर हे इंदूरच्या महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेले आहे. 1780 मध्ये अहिल्यादेवींनी काशी विश्वनाथाचा जीर्णोद्धार केला होता. 1983 पासून या मंदिराचे व्यवस्थापन उत्तर प्रदेश सरकारकडे आहे.

‘ज्ञानवापी’खाली चारही कोपर्‍यांत ‘मंडपम’

सन 1868 मध्ये रेव्ह. एम. ए. शेरिंग यांनी लिहिलेले ‘द सॅक्रेड सिटी ऑफ हिंदू’ (हिंदूंचे पवित्र शहर) या पुस्तकात, ज्ञानवापी मशिदीखाली चारही कोपर्‍यांत मंडपम आहेत. ज्ञान मंडपम, शृंगार मंडपम, ऐश्वर्य मंडपम आणि मुक्ती मंडपम अशी त्यांची नावे आहेत. अन्य एका परदेशी लेखकाने मंडपमचे आकारही नमूद केले आहेत. (Gyanvapi controversy)

असे वर्ष, अशा घडामोडी…

  • 1669 : काही इतिहास तज्ज्ञांच्या मते, 1669 मध्ये औरंगजेब याने काशी विश्वनाथ मंदिराचा एक भाग भग्न करून ज्ञानवापी बनविली होती. काहींच्या मते, चौदाव्या शतकात जौनपूरच्या शरिकी सुलतानाने मंदिर तोडून मशीद बनविली. मंदिर आणि मशिदीदरम्यान दहा फुटांची विहीर आहे. तिला ‘ज्ञानवापी’ म्हटले जाई.
  • 1809 : मंदिर-मशीद असे वाद स्वातंत्र्यकाळापूर्वीही झाले आहेत. 1809 मध्ये हिंदूंनी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीदरम्यान एक पूजास्थळ बनविण्याचा प्रयत्न केला होता.
  • 1948 : मशिदीला तीन घुमट आहेत. मशिदीची एक मिनार 1948 च्या पुरात वाहून गेली होती.
  • 1991 : काशी विश्वनाथ मंदिराच्या पुरोहितांच्या वंशजांनी वाराणसी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. मूळचे मंदिर 2 हजार 50 वर्षांपूर्वी राजा पहिला विक्रमादित्य याने बनविले होते. 1669 मध्ये औरंगजेबाने ते तोडून मशीद बांधली, असा दावा त्यात करण्यात आला होता. ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट 1991’ येथे लागू होत नाही; कारण मंदिराच्या अवशेषांवर ही मशीद उभी राहिलेली आहे, असा युक्तिवादही करण्यात आला होता.
  • 1998 : ज्ञानवापी मशिदीची अंजुमन इंतजामिया समिती त्याविरोधात उच्च न्यायालयात गेली. उच्च न्यायालयाने खालच्या कोर्टाच्या कार्यवाहीला स्थगिती दिली.
  • 2019 : विजय शंकर रस्तोगी यांनी वाराणसी जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी मशीद परिसर पुरातत्त्व सर्वेक्षणासाठी खुला करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली. हायकोर्टाच्या स्थगिती आदेशाच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर 2019 मध्ये वाराणसी न्यायालयात याप्रकरणी पुन्हा सुनावणी सुरू झाली.
  • 2020 : अंजुमन इंतजामिया समितीने सर्वेक्षणाला विरोध केला. याच वर्षी रस्तोगी यांनी खालच्या कोर्टात सुनावणी पुन्हा सुरू करावी म्हणून याचिका दाखल केली.
  • 2022 : परिसरात पुरातत्त्व विभागाकडून सर्वेक्षण सुरू.

हे ही वाचा :

Back to top button