कोल्हापूर : पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण 9.99 टक्क्यांवर | पुढारी

कोल्हापूर : पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण 9.99 टक्क्यांवर

कोल्हापूर : राजेंद्र जोशी
केंद्र शासनाच्या पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टाला निर्धारित वेळेपूर्वी तब्बल सात महिने अगोदर गाठणे शक्य झाले आहे. देशात पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 9.99 टक्क्यांवर गेले असून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांनी 10 टक्के मिश्रणाची मर्यादा यापूर्वीच ओलांडून 15 टक्क्यांच्या उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांनी नुकतीच ही माहिती दिली.

पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाबरोबर केंद्र सरकारने डिझेलमध्ये 5 टक्के बायोडिझेल मिश्रणाचे उद्दिष्ट निर्धारित केले असून, 2030 पर्यंत या उद्दिष्टाची पूर्ती करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार आहे. देशाच्या इंधनावर खर्ची पडणार्‍या परकीय चलनामध्ये कपात करणे आणि हवेतील कार्बन मिश्रणाचे प्रमाण रोखून प्रदूषणाची तीव्रता कमी करणे. तसेच शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनाला अधिक दर देणे यासाठी केंद्राने हे महत्त्वाकांक्षी मिशन सुरू केले आहे. यामध्ये पेट्रोलमधील 10 टक्के मिश्रणासाठी 31 डिसेंबर 2022, तर 20 टक्क्यांच्या मिश्रणासाठी 2030 साल हे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. या उद्दिष्टाची पूर्ती करण्यासाठी केंद्र शासनाच्या पातळीवर इथेनॉलविषयक धोरण ठरविण्यात आले आहे. यानुसार इथेनॉलला समाधानकारक आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली.

इथेनॉलनिर्मिती प्रकल्पांसाठी दीर्घ मुदतीचे आणि कमी व्याजाचे वित्तसहाय्य उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. शिवाय, इथेनॉल मिश्रणविरहित पेट्रोल विक्रीसाठी 1 ऑक्टोबर 2022 पासून प्रतिलिटर 2 रुपये अधिभारही जाहीर करण्यात आला आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम आता इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टावर दिसून येतो आहे. यामुळेच 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट 7 महिन्यांपूर्वीच गाठता येणे शक्य झाले, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button