इचलकरंजी नगरपरिषद : निवृत्त कर्मचार्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न | पुढारी

इचलकरंजी नगरपरिषद : निवृत्त कर्मचार्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी नगरपरिषद : वारंवार मागणी करुनही पेन्शन आणि वैद्यकीय बिल न मिळाल्याने नारायण शंकर लंगोटे या सेवानिवृत्त कर्मचार्‍याने गुरूवारी नगरपालिकेत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी माजी पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांच्यासह नागरिकांनी तातडीने धाव घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या प्रकारामुळे पालिकेत मोठी खळबळ उडाली. दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी नारायण लंगोटे यांना ताब्यात घेतले आहे.
चार महिन्यांपूर्वी लंगोटे सेवानिवृत्त झाले आहेत. इचलकरंजी नगरपरिषद सेवेत असतानाच त्यांचे ऑपरेशन झाले होते. त्याचे जवळपास 1 लाख 16 हजारांचे वैद्यकीय बिल त्यांनी पालिकेकडे जमा केले होते. हे बिल तातडीने मिळावे यासाठी लंगोटे सातत्याने पाठपुरावा करीत होते.
दरम्यान, दुसर्‍यांदा त्यांचे ऑपरेशन करायचे असल्यामुळे पेन्शन लवकरात लवकर मिळावी यासाठी लंगोटे प्रयत्न करीत होते. मात्र त्यांना अद्याप रक्कम मिळालेली नाही.
त्यामुळे संतप्त झालेल्या लंगोटे यांनी गुरूवारी सकाळी 11.30 च्या सुमारास विरोधी पक्ष कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेतले.
काडीपेटीतून काडी काढत असतानाच माजी सभापती चोपडे, युवराज शिंगाडे, विजय रवंदे, रणजीत शिंगाडे यांनी धाव घेवून काडेपेटी काढून घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
त्यानंतर पालिकेच्या कर्मचार्‍यांनी त्यांच्या अंगावर पाणी मारले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी पालिकेत धाव घेतली.
दरम्यान, लंगोटे यांचे वैद्यकीय बिल 40 हजारांपेक्षा जास्त असल्यामुळे त्याला स्थायी समितीची मंजुरी घेणे आवश्यक आहे.
शिवाय पेन्शनची रक्कमही दोन ते तीन दिवसात मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
काही महिन्यांपूर्वीच पालिकेच्या आवारात नरेश भोरे यांनी आत्मदहन केले होते. या घटनेची चर्चा यावेळी सुरू होती.
हे ही वाचलं का?

Back to top button