कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : भाजपला जनाधार नाही म्हणून त्यांनी पैसे वाटले, सतेज पाटील यांचा आरोप

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : भाजपला जनाधार नाही म्हणून त्यांनी पैसे वाटले, सतेज पाटील यांचा आरोप

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज मंगळवारी कसबा बावडा येथील राजर्षी शाहू विद्यामंदिरातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर निशाणा साधला. भाजपला जनाधार नाही. यामुळे त्यांनी पैसे वाटले. पैशानं स्वाभिमान विकला जाणार नाही हे कोल्हापूरचे लोक दाखवून देतील, असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडी आणि भाजप यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (दि. १२) सकाळी मतदानाला सुरुवात झाली. प्रचारासाठी दोन्ही बाजूंनी उतरलेल्या नेत्यांच्या फौजा आणि आरोप-प्रत्यारोपाच्या धुरळ्याने कमालीच्या गाजलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव आणि भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यात चुरस असली तरी पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पाकिटातून पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून भाजपच्या ५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८६ हजार ३० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. मंगळवार पेठ, सुतारवाडा व वारे वसाहत परिसरात पोलिसांच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईने शहरात खळबळ उडाली. ताब्यात घेतलेल्यांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरा त्यांची सुटका करण्यात आली.

यावर सतेज पाटील यांनी, भाजप पैसे देऊन मते घेत असल्याचा आरोप केला आहे. भाजपला जनाधार नाही म्हणूनच त्यांनी पैसे वाटले. पैसे वाटप प्रकरणी भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावर आता चंद्रकांत पाटील सारवासारव करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. काँग्रेसने कुठेही पैशांचे वाटप केलेले नाही, असा दावा सतेज पाटील यांनी केला.

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news