कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पाकिटातून पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून भाजपच्या 5 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 86 हजार 30 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. मंगळवार पेठ, सुतारवाडा व वारे वसाहत परिसरात पोलिसांच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. ताब्यात घेतलेल्यांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरा त्यांची सुटका करण्यात आली.
अशोक शंकरराव देसाई (वय 57, रा. फुलेवाडी, रिंगरोड), विजय महादेव जाधव (48, चौथी गल्ली, राजारामपुरी), संतोष सदाशिव माळी (40, मंगळवार पेठ), जोतिराम तुकाराम जाधव (44, राजीव गांधीनगर गल्ली नं. 8, जयसिंगपूर, सध्या घोरपडे गल्ली, कोल्हापूर), प्रवीण जयवंत कणसे (भोसलेवाडी) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
वारे वसाहत परिसरात सोमवारी मध्यरात्री पैसेवाटपाचा प्रयत्न झाला. भरारी पथकाची चाहूल लागताच पाठलाग करण्याचा प्रयत्न झाला. संशयितानी मोपेड (एमएच 09 ईटी 3175) बेवारस स्थितीत टाकून पलायन केले. पथकाने मोपेडची तपासणी केली असता डिकीत 500 रुपयांच्या नोटा असलेली 3 पाकिटे आढळून आली.
मंगळवार पेठ येथील पद्मावती मंदिराजवळ भाजपच्या माजी नगरसेविका सुनीता मोहिते यांच्या कार्यालयातून मतदारांना पैशाचे वाटप होत असल्याची बातमी समजताच अनिल कृष्णा सलगर यांच्यासह भरारी पथकाने छापा टाकला. यावेळी अशोक देसाई, विजय जाधवसह संतोष माळी तेथे आढळून आले. पोलिसांनी 45 हजार 500 रुपयांची रोकड, पांढर्या रंगाची पाकिटे, मतदारांच्या नावाची यादी आढळून आली. संशयितांविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जोतिराम जाधव, प्रवीण कणसे यांनाही सुतारवाडा येथे सोमवारी सायंकाळी भाजप उमेदवारांसाठी मतदारांना पैसे वाटप करीत असल्याच्या आरोपावरून लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. 35 हजार रुपयांची रोकड, मोपेड, मोबाईल हँडसेट ताब्यात घेण्यात आला आहे. संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी सांगितले.
मतदारांना आमिष दाखवण्यासाठी पैसे वाटप करणे हा गंभीर प्रकार आहे. अशा गुन्ह्यातील संशयितांवर कठोर कारवाईच्या सूचना प्रभारी अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत, असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.