सतेज पाटील आणि चंद्रकांत पाटील बिंदू चौकात नाही तर भेटले ‘या’ गल्लीत, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला असताना आणि दररोज एकमेकांवर टोकाचे आरोप होत असताना पालकमंत्री सतेज पाटील व माजी पालकमंत्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अचानक बुधवारी दुपारी समोरासमोर आले.
भेंडे गल्लीत जैन मंदिरातील एका कार्यक्रमासाठी हे दोघेही एकाचवेळी दाखल झाले आणि समोरासमोर त्यांची भेट झाली. दोघांनी क्षणभर एकमेकांकडे पाहिले, स्मितहास्य केले, नमस्कार केला आणि आपापल्या मार्गाने निघून गेले. क्षणाधार्थ या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि संपूर्ण शहरभर या भेटीची चर्चा रंगली.
स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांचा पट्टाभिषेक सोहळा कासार गल्ली येथील श्री जिनसेन मठामध्ये आयोजित केला होता. महास्वामींच्या दर्शनासाठी सकाळपासून राजकीय, धार्मिक, सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर येत होते.
'अगोदर हनुमानाला भेटतो, नंतर रामाला' : चंद्रकांत पाटील
यावेळी चंद्रकांत पाटील महास्वामींचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडले. त्याचवेळी भेंडे गल्ली येथे समोरून पालकमंत्री सतेज पाटील, मालोजीराजे येत होते. त्यांच्या सोबत राजेश लाटकरही होते. आ. पाटील समोरून येत असताना लाटकर यांनी जय जिनेंद्र दादा असे म्हणत नमस्कार केला.
सोबत पालकमंत्री सतेज पाटील होते. त्यांनीही दादा नमस्कार, आम्ही ही इकडे आहोत असे म्हणत त्यांचे लक्ष वेधले. यावर चंद्रकांत पाटील मिश्कीलपणे 'अगोदर हनुमानाला भेटतो, नंतर रामाला' असे म्हणताच दोघेही खळखळून हसले आणि आपापल्या मार्गाने निघून गेले.