कोल्हापूर : पन्हाळा; ‘नकोशी’च्या बळींचे केंद्रस्थान! देवमाणूसच ठरताहेत यमदूत | पुढारी

कोल्हापूर : पन्हाळा; ‘नकोशी’च्या बळींचे केंद्रस्थान! देवमाणूसच ठरताहेत यमदूत

कोल्हापूर : पूनम देशमुख
स्त्री भ्रुणहत्या  रोखण्यासाठी गर्भलिंग चाचणी करण्यावर कायद्याने बंदी आहे. परंतु कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदानच नाही तर अवैध गर्भपाताचा पर्दाफाश झाला आहे. ‘लेक वाचवा’ यासारखे अभियान राबवूनही लोकांच्या मानसिकतेत बदल झालेला नाही. आजही वंशाच्या पणतीपेक्षा दिवाच महत्त्वाचा आहे, हे धक्कादायक वास्तव पन्हाळा तालुक्यातील पडळ येथील बोगस डॉक्टरांवर केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आले आहे. देवमाणूस असणारे डॉक्टरच मुलींसाठी यमदूत ठरत असून पन्हाळा तालुका ‘नकोशी’च्या बळीचे केंद्रस्थान ठरला आहे.

तालुक्यातील विरळ लोकवस्ती अशा बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असून अवैध कामांसाठी तेथील डॉक्टर आणि एजंटांची मोठी साखळी असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. गोवा, कर्नाटक, बेंगलोरसह मुंबई, पुणे आणि जिल्हाभरातून अवैध गर्भलिंग चाचणी आणि गर्भपातासाठी महिला येथील डॉक्टरांकडून उपचार घेतात. येथील काही डॉक्टरांकडे मेडिकल सर्टिफिकेट नसून त्यांच्याकडे ऑपरेशन करण्याचाही परवाना नाही; मात्र तरीही पैशासाठी महिलांचे जीव धोक्यात घालण्याचे सर्रास धंदे या भागात सुरू आहेत. पडळमध्ये भाड्याच्या खोलीत हे रॅकेट चालत होते. कोणत्याही रक्तापाताशिवाय वेदनारहित गर्भपात करण्याचा दावा या डॉक्टरांकडून करण्यात येत होता. मुलगा आणि मुलगी असे लिंगभेदानुसार गर्भपातासाठी पैसे आकारले जात होते. केवळ मुलींचाच नाही तर मुलांचाही जीव या बोगस डॉक्टरांनी घेतला आहे. दर महिन्याला 13 ते 15 प्रकरणे या डॉक्टरांकडे येतात. रुग्णांच्या असहाय्यतेचा फायदा घेतात. एका महिन्यात उकळले1 लाख 14 हजार रुपये पडळमध्ये अवघ्या सहाशे रुपयांच्या भाड्याच्या खोलीत हे गर्भचाचणी आणि गर्भपाताचे रॅकेट चालत होते. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांतच सुमारे 30 गर्भपात करण्यात आले. त्यांच्या डायरीत तशी नोंद असून रुग्णाचे नाव, गर्भाचे लिंग आणि त्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम त्यात दिसून येते. या बोगस डॉक्टरांनी मार्च महिन्यात 14 महिलांकडून गर्भलिंग आणि गर्भपात करण्यासाठी 1 लाख 14 हजार 500 रुपये उकळले आहेत. (क्रमश:)

हेही वाचलतं का? 

Back to top button