महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीर आउट, पुण्याच्या हर्षल कोकाटेने एकेरी पटावर केला पराभव | पुढारी

महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीर आउट, पुण्याच्या हर्षल कोकाटेने एकेरी पटावर केला पराभव

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : ६४ व्या महाराष्ट्र केसरी साठी प्रबळ दावेदार समजला जाणारा २०१९ चा महाराष्ट्र केसरी विजेता नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. पुण्याच्या हर्षल कोकाटे याने एकेरी पटावर ७ विरुद्ध ५ अशा गुणांनी हर्षवर्धनचा पराभव केला. त्यामुळे हर्षवर्धनला गादी गटातून सेमीफायनलमध्ये आपला गाशा गुंडाळावा लागला.

गादी गटात नाशिकचा पै. हर्षवर्धन सदगीर विरूध्द पुण्याचा पै. हर्षल कोकाटे यांच्याच लढत झाली.  महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शुक्रवारी पावसामुळे व्यत्यय येऊन उपांत्य फेरीच्या लढती रद्द कराव्या लागल्या होत्या. दरम्यान, महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब कोण पटकावणार? कुणा-कुणामध्ये रंगणार मुख्य लढत याची कुस्तीप्रेमींना उत्कंठा लागून राहिली आहे.

येथील जिल्हा क्रीडा संकुलात मंगळवारपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर शुक्रवारी सायंकाळी पाऊस कोसळला. या पावसात स्पर्धेचा आखाडा व लाईटच्या टॉवरचे नुकसान झाले. स्पर्धेचा 50 बाय 250 जो आखाडा आहे त्या आखाड्याचा लाईटचा सेट कोसळला. या सेटवरील हॅलोजन तुटून त्याच्या काचा माती व मॅटरवर पसरल्या गेल्या. जोरदार पावसामुळे सर्वत्र चिखल झाला होता. जोरदार वार्‍यामुळे स्टेजचेही नुकसान झाले. परिसरात सर्वत्र चिखल झाला आहे. व्यासपीठारील सर्व साहित्य भिजले. वार्‍यामुळे साहित्य इकडे तिकडे झाले. शाहू स्टेडियममध्ये ठिकठिकाणी पाणी साचले आहे. आखाड्यावर कोसळलेला लाईटसेट उभारण्यासाठी क्रेनला पाचारण करण्यात आले. त्यामुळे अवघ्या काही मिनिटात हा सेट पुन्हा एकदा उभारण्यात आला. परंतु, या पावसामुळे आखाड्यातील माती व मॅट भिजले होते.

Back to top button