चार उपजिल्हा रुग्णालये होणार ई-हॉस्पिटल! अशी असेल पेपरलेस पद्धत | पुढारी

चार उपजिल्हा रुग्णालये होणार ई-हॉस्पिटल! अशी असेल पेपरलेस पद्धत

कसबा बावडा; पवन मोहिते : जिल्ह्यातील चार उपजिल्हा रुग्णालये ई-हॉस्पिटल (पेपरलेस) होणार आहेत. यामध्ये रुग्ण दाखल झाल्यापासून औषधोपचार घेऊन तो रुग्णालयातून बाहेर पडेपर्यंत सर्व नोंदी ऑनलाईन होणार आहेत. येत्या काही महिन्यांत ई-हॉस्पिटल अर्थात पेपरलेसची कार्यपद्धत सुरू होणार आहे.

केंद्र सरकार व राज्य शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व संलग्‍न कर्मचारी यानुसार आवश्यक संगणक व तत्सम साहित्य याची माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे. रुग्ण नोंदणीपासून त्याची तपासणी, चाचण्या, औषधोपचार या सर्व गोष्टी ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. यासाठी केंद्र सरकारचे सॉफ्टवेअर आहे. आवश्यकता भासल्यास सुरू असलेल्या उपचारासंदर्भात रुग्णाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन माहिती देण्यात येणार आहे.

…अशी असेल पेपरलेस पद्धत

रुग्ण उपचारासाठी येताच त्याला प्रथम संगणक प्रणालीद्वारे नोंद करावी लागेल. या ठिकाणी त्याला टोकन नंबर देण्यात येईल. ज्या वैद्यकीय अधिकार्‍याकडे तपासणी होणार त्या वैद्यकीय अधिकार्‍याकडे तो टोकन नंबर वर्ग करण्यात येईल. त्यानंतर गरज असल्यास त्याच्या चाचण्या करण्यासाठी संबंधित वैद्यकीय अधिकारी त्या-त्या विभागांना ऑनलाईन कळवेल. रुग्णाला जी औषधे दिली आहेत, ती औषध पुरवठा विभागाला ऑनलाईन पद्धतीनेच कळविण्यात येतील. रुग्णाने आपला टोकन नंबर सांगितल्यानंतर त्याला या ठिकाणी औषधे देण्यात येतील.

Back to top button