सातारा : विशाल गुजर
राज्याच्या अर्थसंकल्पात रायगड किल्ला व परिसरासाठी 100 कोटी तर राजगड, तोरणा, शिवनेरी, सुधागड, विजयदुर्ग व सिंधुदुर्ग या सहा किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली. मात्र, या यादीत मराठ्यांची शेवटची राजधानी राहिलेल्या अजिंक्यतारा, ऐतिहासिक प्रतापगड यांसह जिल्ह्यातील 26 किल्ल्यांमधील एकाही किल्ल्याचे नाव नाही. त्यामुळे किल्ले संवर्धनात सातार्याला भोपळा मिळाला आहे. यामुळे या जिल्ह्यातील इतिहासप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.
छत्रपती शाहू महाराजांनी ज्या किल्ले अजिंक्यतार्यावर स्वतःचा राज्याभिषेक करून घेवून अजिंक्यतार्याला स्वराज्याची राजधानी म्हणून नावारूपाला आणले, ज्या किल्ल्याच्या सदरेवरून त्यांनी अखंड हिंदुस्थानावर मराठ्यांची दहशत, दबदबा निर्माण केला त्या किल्ले अजिंक्यतार्याकडे केलेले दुर्लक्ष अक्षम्य आहे. 2012 मध्ये झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अजिंक्यतारा किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करायचे ठरले होते. त्याबाबत संबंधित विभागाला लोकप्रतिनिधींनी सूचनाही दिली होती, त्याचे नंतर काय झाले? हा प्रश्न 10 वर्षानंतरही अनुत्तरित आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्याच्या पायथ्याशी अफझलखानाचा खात्मा करून महापराक्रम केला, त्या किल्ले प्रतापगडाचाही या यादीत समावेश नाही. प्रतापगडावर 'शिवप्रताप दिन' साजरा करण्यात येतो. असे असतानाही या किल्ल्याच्या संवर्धनासाठी एक रुपयाचा निधीही दिला नाही, ही बाब खेदजनक आहे. परवाच सादर झालेल्या अर्थसंकल्पात किल्ल्यांच्या संवर्धनासाठी भरीव निधी मिळेल, अशी अपेक्षा होती, ती अपेक्षाही आता फोल ठरली आहे.
या अर्थसंकल्पात रायगड, राजगड, तोरणा, शिवनेरी, सुधागड, विजयदुर्ग या किल्ल्यांसाठी भरिव तरतूद केली आहे. त्याचबरोबर मुंबईतील शिवडी व सेंट जॉर्ज किल्ल्यांच्या जतन व संवर्धन आराखड्यासाठी एकूण 7 कोटी प्रस्तावित करण्यात आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांच्या गनिमी कावा युद्ध पद्धतीला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यासाठी युनेस्कोकडे राज्य सरकारतर्फे प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे.
अजिंक्यतारा, प्रतापगड, कमळगड, कल्याणगड, केंजळगड, चंदनगड, वंदनगड, जंगली जयगड, गुणवंतगड, प्रचितगड, पांडवगड, भूषणगड, मकरंदगड, मच्छिंद्रगड, महिमंडनगड, महिमानगड, सज्जनगड, सदाशिवगड, संतोषगड, सुंदरगड, वर्धनगड, वसंतगड, वारूगड, वैराटगड, भैरवगड, वासोटा व दातेगड असे एकूण 26 किल्ले जिल्ह्यात आहेत.