शिरटी (ता. शिरोळ); पुढारी वृत्तसेवा : Shirol Flood कृष्णा नदीला आलेल्या महापुराने शिरोळ तालुक्यातील शिरटी, हसुर, कनवाड, परिसराला चारी बाजुंनी पाण्याचा वेढा पडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे.
त्यामुळे पाण्याच्या पातळी स्थिर राहिली असून अद्याप त्यामध्ये घट झालेली नाही. आशा या भयावह परिस्थितीत मयत झालेल्या नागरिकांच्या मृतदेहावर मोकळी जागा दिसेल तिथे अंत्यसंकार केले जात आहेत.
काल हसुर येथील माजी सरपंच भाऊसाहेब हजारे यांचे निधन झाले. मात्र चारही बाजुंनी महापुराचा पाणी असल्याने अंत्यसंस्कार कोठे करायचे असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला.
शेवटी होडीतून प्रेत नेऊन कनवाड रोडवर मोकळ्या जागेत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तसेच शिरटी येथे दोन दिवसांपूर्वी शेतातच पाणी नसलेल्या ठिकाणी वयस्कर महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील बुधले मंगल कार्यालयाजवळ महामार्गावर महापूराचे पाणी ओसरल्याने ३ दिवसांनंतर वाहतूक सुरू झाली आहे.
आज (सोमवारी) सकाळी १० वाजता प्रथम अवजड वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली. तसेच अत्यावश्यक वाहने कोल्हापूरच्या दिशेने सोडण्यात आली. सकाळी ७ वाजता रस्तावर प्रात्यक्षिक घेण्यात आली.
पोकलँंड आणि जेसीबीसारख्या अवजड वाहने प्रथमतः प्रात्यक्षिक घेण्यात आली. त्यानंतरच रस्ता वाहतुकीसाठी योग्य असल्याची खात्री केल्यानंतर वाहतुकींसाठी महामार्ग सुरू करण्यात आला.
तुळशी धरण भरले..
तुळशी धरण पुर्ण भरले आहे. तुळशी धरण परिसरात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. पूर परिस्थितीचा विचार करता आणि धरण पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील तळीये गाव 22 जुलैला अतिवृष्टीमुळे दरड कोसळून उद्ध्वस्त झाले होते. कालपर्यंत दरडीच्या ढिगार्यातून 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.
मात्र आज चौथ्या दिवशी बचावकार्य थांबविण्यात आले असून, बेपत्ता असलेल्या 31 जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा 84 वर पोहोचला आहे.