कोल्हापूर : प्रभाग रचना हरकतींवर होणार आज सुनावणी | पुढारी

कोल्हापूर : प्रभाग रचना हरकतींवर होणार आज सुनावणी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेने निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार केली आहे. त्यावर 115 हरकती दाखल झाल्या आहेत. गुरुवारी (दि. 24) सर्व हरकतींवर सुनावणी होणार आहे.

राज्य निवडणूक आयागाने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना सुनावणीसाठी नियुक्त केले आहे. सर्किट हाऊसमधील राजर्षी शाहू सभागृहात ही सुनावणी होईल. विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी, निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी, जिल्हाधिकार्‍यांचे प्रतिनिधी व महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात येणार आहे.

महापालिकेने 1 फेब—ुवारी रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली. 14 फेब्रुवारीपर्यंत त्यावर हरकती मागविण्यात आल्या. प्रारूप प्रभाग रचनेवर 115 हरकती व सूचना आल्या आहेत. राजर्षी शाहू सभागृहात सकाळी 10 पासून सुनावणी घेण्यात येणार आहे. 115 हरकतदारांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे.

त्यांना दिलेल्या वेळेनुसारच सुनावणीच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.सुनावणीनंतर अधिकार्‍यांनी केलेल्या शिफारशी 2 मार्च रोजी राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहेत. 4 मार्च रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल.

20 मार्चला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध

कोल्हापूर शहरात पहिल्यांदाच त्रिसदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणूक होत आहे. त्याअंतर्गत 31 प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येकी 3 नगरसेवकांसाठी 30 व दोन नगरसेवकांचा 1 प्रभाग असेल. 28 फेब—ुवारीपर्यंत मतदार याद्यांचे काम पूर्ण केले जाणार आहे. 8 मार्चला वॉर्डनिहाय कच्ची यादी प्रसिद्ध होईल. 20 मार्चला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

Back to top button