प्लुटोवरील वातावरणाचा दाब पृथ्वीच्या तुलनेत अतिशय कमी | पुढारी

प्लुटोवरील वातावरणाचा दाब पृथ्वीच्या तुलनेत अतिशय कमी

न्यूयॉर्क : एका नव्या संशोधनातून भारतीय व आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या एका टीमने प्लुटोच्या पृष्ठभागावरील तेथील वातावरणाच्या दाबाचे अचूक अनुमान करण्यात यश मिळवले आहे. पृथ्वीवरील समुद्रतळाच्या सरासरी वातावरणीय दबावाच्या तुलनेत प्लुटोच्या पृष्ठभागावर 80 हजार पटीने कमी वातावरणीय दाब असल्याचे अनुमान करण्यात आले आहे.

एका तार्‍याच्या 6 जून 2020 मधील आच्छादनाच्या खगोलीय घटनेतून हा अभ्यास करण्यात आला. त्याला ‘स्टेलर ऑक्युल्टेशन’ असे म्हटले जाते. एखादा खगोल आणि दर्शक यांच्यामधून अन्य खगोल आला आणि त्याने संबंधित मूळ खगोलास पूर्णपणे आच्छादित केले की त्याला ‘स्टेलर ऑक्युलेशन’ म्हटले जाते. ही एक दुर्मीळ अवकाशीय घटना असते व त्यामधून अनेक गोष्टी समजत असतात. त्यामुळे जगभरातील संशोधक अशा घटनांवर लक्ष ठेवून असतात.

उत्तराखंडमधील नैनीतालच्या देवस्थल येथील 3.6 मीटरच्या देवस्थल ऑप्टिकल टेलिस्कोपने (डीओटी) अशीच एक घटना पाहण्यात आली. ही भारतातील सर्वात मोठी ऑप्टिकल टेलिस्कोप असून तिच्या व 1.3 मीटरच्या देवस्थल फास्ट ऑप्टिकल टेलिस्कोपच्या (डीएफओटी) सहाय्याने या खगोलीय घटनेचा अभ्यास करण्यात आला. 1988 आणि 2016 दरम्यान प्लुटोबाबत घडलेल्या अशा बारा तारकीय प्रच्छादनांशी संबंधित आकडेवारीत या अवधीत वातावरणीय दाबात तिप्पटीने मोनोटोनिक वाढ झाल्याचेही दिसले.

Back to top button