कोल्हापूर : ‘प्रॅक्टिस’ला ‘बीजीएम’कडून पराभवाचा धक्‍का

कोल्हापूर : ‘प्रॅक्टिस’ला ‘बीजीएम’कडून पराभवाचा धक्‍का

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
बलाढ्य प्रॅक्टिस फुटबॉल क्लबवर 2 विरुद्ध 1 अशा गोलफरकाने मात करून 'बीजीएम' स्पोर्टस्ने 'केएसए' लीग फुटबॉल स्पर्धेचा धडाकेबाज प्रारंभ केला. तत्पूर्वीच्या सामन्यात सम्राटनगर स्पोर्टसने 'खंडोबा – ब' संघावर 2 विरुद्ध 0 असा विजय मिळविला.
कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) आयोजित सन 2021-22 च्या 'केएसए' लीग फुटबॉल स्पर्धेस मंगळवारी छत्रपती शाहू स्टेडियमवर प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन 'केएसए' चे चिफ पेट्रन शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी 'केएसए'चे अध्यक्ष, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे, 'विफा'च्या महिला अध्यक्षा मधुरिमाराजे, सचिव माणिक मंडलिक यांच्यासह 'केएसए'चे पदाधिकारी उपस्थित होते. संयोजन अमर सासने, संभाजीराव पाटील-मांगोरे, राजेंद्र दळवी, नाना जाधव, दीपक राऊत, दीपक घोडके, विश्‍वास कांबळे, मनोज जाधव, बाळकृष्ण पोरे, नंदकुमार बामणे, सहकार्‍यांनी केले.

सम्राटनगर संघाचा विजय

दुपारी पहिला सामना खंडोबा तालीम 'ब' विरुद्ध सम्राटनगर फुटबॉल क्लब यांच्यात झाला. सामन्याच्या 38 व्या मिनिटाला सम्राटनगर रजत जाधवने गोलची नोंद करत मध्यंतरापर्यंत 1-0 अशी आघाडी मिळविली. उत्तरार्धात 50 व्या मिनिटाला सम्राटनगरच्या रोहित भोसलेने दुसरा गोल नोंदवत 2-0 अशी भक्‍कम आघाडी केली. पूर्णवेळ होईपर्यंत खंडोबाकडून एकाही गोलची परतफेड होऊ शकली नाही.

'बीजीएम'ची 'प्रॅक्टिस'वर मात

दुसर्‍या सामन्यात बी.जी.एम. स्पोर्टस्ने विरुद्ध प्रॅक्टिस क्लबवर 2-1 अशी मात केली. सुरुवातीपासूनच बीजीएमने जलद व आक्रमक खेळ सुरू ठेवला. त्यांच्या वैभव राऊतने 34 व्या मिनिटाला गोल नोंदवत 1-0 अशी आघाडी मिळविली. ही आघाडी फार काळ टिकू शकली नाही. प्रॅक्टिसकडून कैलास पाटील याने 38 व्या मिनिटाला गोलची परतफेड करून सामना 1-1 असा बरोबरीत केला. मध्यंतरापूर्वीच्या जादा वेळेत (42 वा मिनीट) केवळ कांबळे याने उत्कृष्ट गोल नोंदवत आघाडी 2-1 अशी केली. यानंतर सामना वेगवान झाला. प्रॅक्टिसकडून कपिल शिंदे, कैलास पाटील, ओंकार मोरे यांनी केलेले प्रयत्न बीजीएमने अपयशी ठरविले. त्यांच्या साहिल खोत, सिद्धेश साळोखे, अभिजित साळोखे, ओंकार जाधव यांनी तिसर्‍या गोलसाठी केलेले प्रयत्नही अपयशी ठरले.

25 हजार जणांनी पाहिले ऑनलाईन सामने

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने विनाप्रेक्षक सामने आयोजनास परवानगी दिल्याने फुटबॉलप्रेमींसाठी 'केएसए' तर्फे सामन्यांचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन पद्धतीने केले आहे. याचा लाभ फुटबॉलप्रेमींनी आवर्जून घेतला. सुमारे 25 हजार लोकांनी ऑनलाईन पद्धतीने सामने पाहण्याचा आनंद लुटला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news