..अन् शेतकर्‍यांनाच लागले चंदन ; रक्तचंदन लागवड, अनुदानाच्या आमिषाने लाखोंचा गंडा | पुढारी

..अन् शेतकर्‍यांनाच लागले चंदन ; रक्तचंदन लागवड, अनुदानाच्या आमिषाने लाखोंचा गंडा

देवळा : पुढारी वृत्तसेवा
‘पुष्पा’ चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रक्तचंदनाची लागवड अन् शासकीय अनुदानाचे आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी सक्रिय झाली आहे. देवळा, चांदवड व मालेगाव तालुक्यातील काही शेतकर्‍यांना लाखोंचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पहिला गुन्हा देवळा पोलिसांत मंगळवारी (दि.22) दाखल झाला आहे.

तामिळनाडू राज्यातील श्रीलक्ष्मी गणपती नर्सरी कंपनीच्या नावाने आलेल्या सात ते आठ ठगांनी देवळा, मालेगाव व चांदवड तालुक्यातील गिरणारे, कुंभार्डे, झाडी, कोकणखेडे, उसवाड या गावातील शेतकर्‍यांना चंदन लागवडीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घातल्याचे सांगण्यात येत आहे.

रक्तचंदनाच्या प्रति रोपासाठी 200 रुपये भरा अन् दोन हजार रुपयांचे अनुदान मिळावा, असे आमिष दाखविण्यात आले. विशेष म्हणजे ही शासकीय योजना असून, अनुदानाचे वाटप संबधित विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करुनच करतील, असे सांगण्यात आले. या भुलथापांना शेतकरी भुलले. प्रारंभी काही शेतकर्‍यांना रोपेदेखील मिळाली. अधिक रोपे घेतल्यास कुपनलिका आणि शेताला तारांचे कुंपनही करुन देण्याचे आमिष दाखवले गेले. उत्पादीत चंदनाची कंपनीच खरेदी करेल, अशी हमी मिळाल्याने शेतकर्‍यांनी लाखोंची गुंतवणूक केली. परंतु, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कंपनी प्रतिनिधींशी संपर्क न झाल्याने शेतकर्‍यांची धांदल उडाली आहे.

तालुक्यातील गिरणारे येथील शेतकरी विनोद कौतिक खैरनार यांनी 4 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार देवळा पोलिसांत दिली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विक्रांत कचरे व हवालदार चंद्रकांत निकम, नीलेश सावकार हे तपास करीत आहेत.

देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. सात जणांनी चंदनशेती आणि शासकीय अनुदानाचे आमिष दाखवून शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. याप्रकारे अजून कोणाची फसवणूक झाली असेल तर, पोलिसांशी संपर्क साधावा. योग्य कारवाई केली जाईल.
– सचिन पाटील
पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

हेही वाचा :

Back to top button