शिवाजी विद्यापीठ पुरविणार शहराला पाणी; जनावरांना चारा | पुढारी

शिवाजी विद्यापीठ पुरविणार शहराला पाणी; जनावरांना चारा

कोल्हापूर, पुढारी ऑनलाईन :महापुराच्या संकटात शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने उचलली आहे. तसेच शिवाजी विद्यापीठ परिसरातील चारा शहरातील जनावरांना पुरविला जाणार आहे.

अधिक वाचा

जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे शहर व परिसरात निर्माण झालेल्या महापूर परिस्थितीत विद्यापीठाने महानगरपालिका यंत्रणेच्या माध्यमातून शहर व परिसराला पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी उचलली आहे.

कोल्हापूर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहराला पाणीपुरवठा करणारे महानगरपालिकेचे सर्व जलशुद्धीकरण प्रकल्प शुक्रवारी पाण्याखाली गेले आहेत.

अधिक वाचा

त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

हा प्रश्न उद्भवल्याचे लक्षात येताच कालपासूनच शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने आपल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे शहराला पाणी पुरविण्याची तयारी केली.

त्यानुसार महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याशी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांची चर्चा झाली.

शनिवारी सकाळपासून महानगरपालिकेच्या टँकरच्या माध्यमातून विद्यापीठाच्या जलशुद्धीकरण केंद्रातून शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला.

अधिक वाचा

पशुधनासाठी मोफत चारा

शिवाजी विद्यापीठच्या आवारात मोठ्या प्रमाणाच गवत आहे. या गवताचा लिलाव केला जातो.

मात्र, २००५ च्या महापुरावेळी कमवा शिका योजनेतील मुले तसेच विद्यापीठाच्या तीनही होस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांनी हे गवत कापून शिरोळ परिसरात जनावरांसाठी पुरविले होते.

२०१९ च्या महापुरावेळीही विद्यापीठाने येथील गवत पशुधनासाठी खुले केले होते. यावेळी विद्यापीठाने हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. पुरामुळे विस्थापित झालेल्या जनावरांना शिवाजी विद्यापीठाच्या परिसरातून गवत पुरविण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे.

यासंदर्भात माहिती देताना कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ‘सन २०१९च्या पूरस्थितीमध्ये कोल्हापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला होता.

त्यावेळीही शिवाजी विद्यापीठाने महानगरपालिकेच्या यंत्रणेच्या माध्यमातून शहराला पिण्याचे पाणी पुरविले होते. गतानुभव लक्षात घेऊन यंदाही विद्यापीठाने आपली यंत्रणा तयार ठेवली होती.

त्यानुसार शहराला पिण्याचे पाणी पुरविण्यास आज सकाळपासून सुरवात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर असतो. त्यासाठीही विद्यापीठाने आपल्या परिसरातील गवत पुरविण्याची तयारी केली आहे.’

हेही वाचलेत का: 

पहा व्हिडिओ: शहराला महापुराचा विळखा

Back to top button