

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा
इचलकंजी येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गडगे यांचा खून करणाऱ्या हल्लेखोरास अवघ्या बारा तासांत शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. श्रवण कुमार श्यामसुंदर दायमा (वय ३३, रा. स्वामी अपार्टमेंट) असे त्याचे नाव आहे. व्यक्तिगत कारणातून त्याने खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
जयभीम नगर परिसरातून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली. व्यक्तीगत करणातून खून झाल्याचे उघडकीस आले असले तरी नेमके कारण समजू शकले नाही. दायमा याच्यावर मारहाण प्रकरणी यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे.
सुरेश आण्णासो गडगे (वय ५५) यांचा धारदार शस्त्राने मानेवर वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास स्वामी अपार्टमेंट परिसरात घडली होती. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.
सुरेश गडगे हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे माजी अध्यक्ष, तर भ्रष्टाचारविरोधी जनक्रांती आघाडीचे संस्थापक-अध्यक्ष होते. स्वामी अपार्टमेंट येथे रात्री जेवण झाल्यानंतर ते नेहमीप्रमाणे मोकाट कुत्र्यांना घरासमोर बिस्किटे घालत होते, यावेळी हल्लेखोराने त्यांच्यावर हल्ला केला. मानेवर चाकूसारख्या धारदार शस्त्राने केलेला एकच वार वर्मी बसला. त्यामुळे गडगे जागीच कोसळले. ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्या मुलासह नागरिकांनी धाव घेतली. त्यामुळे हल्लेखोराने तेथून पलायन केले.
गंभीर जखमी गडगे यांना तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा :