Video : रेस्क्यू ऑपरेशनचा थरार! दोन दिवस २०० फूट खोल दरीत अडकलेल्या ट्रेकरला भारतीय आर्मीनं वाचवलं | पुढारी

Video : रेस्क्यू ऑपरेशनचा थरार! दोन दिवस २०० फूट खोल दरीत अडकलेल्या ट्रेकरला भारतीय आर्मीनं वाचवलं

कोची; पुढारी ऑनलाईन

केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील (Palakkad district) मलमपुझा (Malampuzha) येथील खोल दरीत दोन दिवस (सुमारे ४८ तास) अडकून पडलेल्या एका ट्रेकरची भारतीय आर्मीच्या जवानांनी (Indian Army) बुधवारी सुखरूप सुटका केली. चेरात्तील बाबू (वय २३) (Cherattil Babu) नावाचा युवक सोमवारी ट्रेकिंग दरम्यान दरीत कोसळून अडकून पडला होता. दरातील एका अवघड ठिकाणी तो बसून राहिला होता. त्याला एका जागेवरून हालताही येत नव्हता. दोन दिवस त्याने अन्न पाण्याविना घालवले. त्याला वाचविण्यासाठी मोठे रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले.

गिर्यारोहक तज्ज्ञांचा समावेश असलेले भारतीय आर्मीच्या दक्षिण कमांडचे पथक रेस्क्यू ऑपरेशनसाठी मंगळवारी रात्री उशिरा मालमपुझा येथे दाखल झाले होते. बुधवारी पहाटे दरीत अडकलेल्या युवकापर्यंत पोहोचण्यासाठी वेगवगेळ्या ठिकाणांहून प्रयत्न करण्यात आले. अखेर आर्मीची रेस्क्यू टीम ज्या ठिकाणी युवक अडकून पडला होता तिथे पोहोचली. तेथे त्याला टीमने पाणी आणि अन्न दिले. कारण तो दोन दिवसांपासून उपाशी होता. दोराच्या साहाय्याने त्याला टेकडीच्या शिखरावर आणण्यात आले.

दरीत अडकून पडलेल्या युवकाला वाचविण्यात यश आले असल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी ट्विट करत दिली आहे. तर युवकाला वाचविण्यात आलेल्या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ भारतीय आर्मीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

बाबू आपल्या दोन मित्रांसमवेत सोमवारी ट्रेकला गेला होता. ट्रेकिंग दरम्यान तो २०० फूट खोल दरीत कोसळला. त्यामुळे तो जखमी झाला होता. त्याला वाचविण्यात त्याच्या मित्रांना अपयश आले होते. त्यानंतर त्याच्या मित्रांनी प्रशासनाला याची माहिती दिली होती. त्यानंतर त्याला वाचविण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली झाल्या. भारतीय आर्मीच्या टीमने या युवकाला दरीतून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अथक परीश्रम घेतले.

Back to top button