

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सुमधुर स्वरांनी कोट्यावधी रसिकांच्या हृदयावर सात दशकांहून अधिक काळ राज्य करणाऱ्या भारताच्या गानकोकिळा, गानसम्राज्ञी भारतरत्न लता दीदी मंगेशकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे.
स्वरांची अभूतपूर्व देणगी लाभलेल्या गानसम्राज्ञी लतादीदींनी गायलेली लाखो गाणी रसिक श्रोत्यांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवत राहतील. संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य आणि अजोड योगदानाबद्दल संपूर्ण भारत देश त्यांचा कायम ऋणी राहील.
आज त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रातील मानाचा दीपस्तंभ हरपला आहे. मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण भारत देश सहभागी आहे. अशी भावना ना. सतेज पाटील ( गृहराज्यमंत्री ) पालकमंत्री, यांनी व्यक्त केली.
भारतरत्न लता मंगेशकर या देशाचा अभिमान होत्या. गायनाच्या माध्यमातून त्यांनी देशाला जगभरात सन्मान मिळवून दिला. त्यांचे संगीत, गायलेली गाणी अजरामर आहेत. जगात त्यांनी देशाला सन्माम मिळवून दिला होता. लता दीदींच्या जाण्याने देशाची हानी झाली असून, देशाने खरा भारत "रत्न´´ हरपला.
लता दीदी आणि शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे नाते सर्वश्रृत आहे. लतादीदी शिवसेनाप्रमुखांना मोठा भाऊ मानायच्या. तर, साहेबदेखील लता दीदींच्या प्रत्येक अडचणीत त्यांच्यासोबत उभे असायचे. त्यामुळे लता दीदी आणि शिवसेनेचे कौटुंबिक नातं निर्माण झाले होते. लता दीदींना भेटण्याचा दोन – तीन वेळा योग आला. अत्यंत प्रेमळ स्वभाव, आपुलकी आणि इतरांप्रती आदरभाव याच कारणानी लता दीदींनी सर्वांनाच आपलेसे केले. त्यांच्या जाण्याने कला जगतातील एका युगपर्वाचा अंत झाला, त्यांच्या जाण्याने कला जगतात निर्माण झालेली पोकळी भरून न निघण्यासारखी आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी भावना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
आपल्या सुरेल स्वरांनी करोडो रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गानसरस्वती गानसम्राज्ञी भारतरत्न लता दीदी मंगेशकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे.
स्वरांची अभूतपूर्व देणगी लाभलेल्या, आपल्या अजरामर स्वरांनी रसिकांच्या मनावर सात दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या लतादीदींच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. अशी भावना आ. ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केल्या.
हे ही वाचलं का