कोल्हापूर महापालिका प्रभाग रचना पुढील आठवड्यात | पुढारी

कोल्हापूर महापालिका प्रभाग रचना पुढील आठवड्यात

कोल्हापूर : सतीश सरीकर

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू होत आहे. प्रारूप प्रभाग रचना पूर्ण करून प्रसिद्ध करण्याचेे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला दिले आहेत. ही प्रभाग रचना पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणार असून आरक्षणासाठी स्वतंत्र आदेश दिले जाणार आहेत.

राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना तसे पत्र पाठविले आहे. यानुसार मनपाने कार्यवाही सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. पुढील आठवड्यात प्रभाग रचना प्रसिद्ध होणार असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.

ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी मिळून त्यावर निर्णय होण्यास काही कालावधी लागणार आहे. निवडणुकीचे कामकाज योग्य कालावधीत पूर्ण करण्यासाठी प्रभागांच्या हद्दी निश्चित करण्याचा टप्पा त्यापूर्वी पूर्ण केला जाणार आहे.

आरक्षण सोडतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागविणे आणि सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी दिलेल्या आदेशात योग्य ते बदल करणे गरजेचे आहे. त्यानुसार मनपा निवडणुकीसाठी सदस्य संख्या ठरविणे, प्रभाग रचना करणे व आरक्षण चक्रानुक्रमे निश्चित करणे यासाठी 28 डिसेंबर 2021 च्या आदेशात सोडत, प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धी, सुनावणी व प्रभाग रचनेच्या अधिसूचना आदीच्या अनुषंगाने सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत.

निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता दिल्यानंतर आरक्षित प्रभागांची सोडत काढण्यापूर्वी हे प्रारूप शासन राजपत्रात प्रसिद्ध करावे लागणार आहे. प्रारूप अधिसूचनेवरील हरकती व सूचनांचे विवरणपत्र आयोगास सादर करावे लागेल. आयोगाने नियुक्त केलेल्या अधिकार्‍यांमार्फत हरकती व सूचनांवर सुनावणी घ्यावी. त्यावर योग्य निर्णय आयोगाकडून घ्यावा व अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करावी. प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्याचे आदेश स्वतंत्रपणे दिले जाणार आहेत.त्यानंतरच आयोगाने दिलेल्या तारखेला प्रभागनिहाय आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.

Back to top button