कोल्हापुरात वाढतेय मुलींच्या जन्माचे प्रमाण | पुढारी

कोल्हापुरात वाढतेय मुलींच्या जन्माचे प्रमाण

कोल्हापूर : पूनम देशमुख

मुलगा हा वंशाचा दिवा, ही भावना आता लेक वाचवा अभियानामुळे मागे पडत चालली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जन्मलेल्या बालकांच्या नोंदीवरून मुलींचा जन्मदर वाढल्याचे शुभसंकेत आहेत. पाच वर्षांमागे जिल्ह्यातील 12 तालुक्यांतील मुलींचा जन्मदर मुलांच्या तुलनेत बराच कमी होता. मात्र, जिल्ह्यात हे प्रमाण आता वाढत असून शाहूवाडी तालुक्यात मुलींचे प्रमाण मुलांपेक्षाही अधिक आहे, ही बाब दिलासादायक आहे.

सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांत मुली-मुलांबरोबर काम करताहेत. आठ- दहा वर्षांपूर्वीची मानसिकता आता बर्‍याच प्रमाणात बदलली आहे. एक-दोन मुलीनंतर मुलगा व्हावा म्हणून जिल्ह्यातील काही तालुक्यांसह सीमावर्ती भागातील दवाखान्यातून अवैधरीत्या गर्भपात करण्याचे प्रकार अनेकदा उघड झाले; मात्र कोरोना काळात मार्च 2020 पासून अनेक महिने प्रवास आणि विनाकारण फिरण्यावर निर्बंध होते. त्यामुळे अवैध गर्भपाताचे प्रमाण घटल्याने मुलींच्या जन्माचा टक्का वाढला आहे.

गर्भलिंग चाचणी आणि बेकायदेशीर गर्भपात लोकजागृती व सरकारच्या आरोग्य विभागाने या विषयावर केलेल्या उपाययोजना व कठोर कारवाईमुळे मुलींचा जन्मदर वाढीस लागला आहे. भ्रूण हत्या होऊ नये म्हणून सर्व स्तरावर शासन प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागात घरोघरी आरोग्यसेविका गर्भवती स्त्रियांची नोंद घेऊन त्यांना प्रसूतीपर्यंत मार्गदर्शन करतात. सावित्रीबाई फुले योजनेंतर्गत एक मुलगी असल्यास दहा, तर दोन मुली असल्यास 20 हजार रुपये सरकार देत असल्याने त्याचाही फायदा मुलींचा जन्मदर वाढण्यास झाला आहे.

जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर अहवाल पाहता मागील दहा वर्षांत भुदरगड, कागल, करवीर, पन्हाळा, राधानगरी आणि शिरोळ तालुक्यांतील स्त्री-पुरुष जन्मदर सातत्याने घसरत आहे. याउलट आजरा, चंदगड, गडहिंग्लज, गगनबावडा, हातकणंगले, शाहूवाडीतील
मुलींच्या जन्मदराचा आलेख सातत्याने चढत असल्याचे निदर्शनास येत आहे.
– डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

Back to top button