कोल्हापूर : शटल सेवा, ब्रॉडगेज मेट्रो प्रत्यक्षात कधी?

कोल्हापूर : शटल सेवा, ब्रॉडगेज मेट्रो प्रत्यक्षात कधी?
Published on
Updated on

कोल्हापूर : अनिल देशमुख

कोल्हापूर हे मध्य रेल्वेचे दक्षिणेकडील अखेरचे स्थानक आहे. तरीही कोल्हापूरच्या रेल्वे प्रवाशांची संख्या अधिक आहे. लोकसंख्येच्या तुलनेत मध्य रेल्वेत सर्वाधिक उत्पन्न देणार्‍या प्रमुख स्थानकांपैकी कोल्हापूर एक स्थानक आहे. विशेष म्हणजे हे सर्वांना मान्यही आहे. तरीही कोल्हापूर-मिरज मार्गावर शटल सेवा, कोल्हापूर-सातारा, कोल्हापूर-पंढरपूर, कोल्हापूर-धारवाड अशा पॅसेंजर गाड्या आणि नव्याने सुचविण्यात आलेली कोल्हापूर-पुणे ब्रॉडगेज मेट्रो, हे सारे प्रत्यक्षात कधी येणार? असा सवाल आहे. कारण, यासाठी लागणारी प्रशासकीय, राजकीय इच्छाशक्ती, पाठपुरावा याचाच अभाव दिसत आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गाचे महत्त्व थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले. सह्याद्री अतिथिगृहावर झालेल्या बैठकीत गडकरी यांनी ठाकरे यांना कोल्हापूर-पुणे मार्गावर ब—ॉडगेज मेट्रो सुरू करण्याची सूचना केली. ब्रॉडगेज मेट्रोचा खर्च किती कमी आहे आणि त्याचा फायदा किती जास्त आहे, हे गडकरी यांनी पटवून दिले. ब्रॉडगेज मेट्रो म्हणजे कोल्हापूर-पुणे मार्गासाठी सध्या असलेल्या रुळांवरूनच (मार्गावरून) ही मेट्रो धावू शकते.

त्यासाठी नव्याने मार्ग उभारणीची गरज नाही. केवळ काही ठिकाणी स्थानकांची आवश्यक ती दुरुस्ती आणि मेट्रोच्या डब्यांसाठी लागणारा निधी, हाच काय तो खर्च होणार आहे. याकडे सकारात्मक आणि विकासात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कोल्हापूर-पुणे ही दोन प्रमुख शहरे ब्रॉडगेज मेट्रोने जोडली गेली तर कोल्हापूरचा विकासाला आणखी गती येईल. परिणामी, राज्याच्या विकासाला ते सहाय्यकारी ठरेलच; पण या सर्वासाठी पाठपुराव्याची गरज आहे. कोल्हापूर स्थानकातून गेल्या पंधरा-वीस वर्षांत कोल्हापूर-तिरुपती, कोल्हापूर-दिल्ली, कोल्हापूर-अहमदाबाद, कोल्हापूर-नागपूर या गाड्या सुरू केल्या.

कोल्हापुरातून गेल्या 15-20 वर्षांत ज्या ज्या गाड्या सुरू झाल्या, त्यातील एकही गाडी 'फेल' गेली नाही. यामुळेच कोल्हापुरातून जयपूर, चेन्नई, कोलकाता या मार्गांवरही गाड्या सुरू करण्याची सातत्याने मागणी होत आहे. मात्र, त्याबाबत निर्णय होत नाही. हा निर्णय होण्यासाठी सातत्याने रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आदी ठिकाणी ठाण मांडायला हवे, नियोजनबद्ध पाठपुरावा करायला हवा. (क्रमश:)

मागणीला केराचीच टोपली

कोल्हापूर-मिरज मार्गावर पाच पॅसेंजर गाड्या आहेत. या सर्व गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद आहे. मात्र, पॅसेंजरचा प्रवास म्हणजे प्रवाशांसाठी कसरतच असते, हे आजवरचे चित्र आहे. यामुळे या मार्गावर कोल्हापूर-मिरज अथवा कोल्हापूर-सांगली अशी शटल सेवांची मागणी सातत्याने आहे. यासाठी शेकडो निवेदने दिली, अनेकदा हा प्रश्न रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचविला गेला, वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र, त्याचा परिणाम अद्याप काहीही झालेला नाही. या मागणीला अजूनही केराचीच टोपली दाखविली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news