

कृषिपूरक उद्योगांसाठी 'मधुर' पर्याय
सध्याच्या परिस्थितीत केवळ शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा या व्यवसायाशी निगडित अन्य पूरक व्यवसाय करणेही क्रमप्राप्त आहे. राज्याच्या विविध भागांतील शेतकरी अशा प्रकारचे पूरक व्यवसाय करून आपली आर्थिक उन्नती साधत आहेत. मधमाशीपालन हा शेतीवर आधारित असाच एक उत्तम व्यवसाय आहे. व्यक्तिगत किंवा सामूहिकपणे हा व्यवसाय करता येतो. अतिरिक्त उत्पन्न मिळण्यासाठी मधमाशीपालन व्यवसाय हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
आपल्याकडे जंगलामधून मध गोळा करण्याचा उद्योग बर्याच वर्षांपासून केला जातो. मध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांना बाजारपेठेत चांगली मागणी असल्यामुळे शेतकर्यांसाठी हा एक चांगला व्यवसाय ठरू शकतो. मधाबरोबरच मेणही मिळत असल्यामुळे मधमाशी पालनातून आर्थिक उन्नती साधणे शक्य होते.मधमाशी पालनाचे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतात. फुलोरा येणार्या अनेक वनस्पतींच्या परागीकरणात मधमाश्या महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे सूर्यफुले किंवा विविध फळांच्या उत्पादनात चांगली वाढ होते. पारंपरिक पद्धतीने मध गोळा करताना मधमाश्यांच्या अनेक वसाहती नष्ट होतात. या पार्श्वभूमीवर पेट्यांमध्ये मधमाश्यांचे संगोपन करून घरच्या घरी मध तयार करताना हा तोटा टाळता येतो. सध्या बाजारपेठेत मध आणि मेणाला चांगली मागणी आहे. शेतावर किंवा घरी पेट्यांमध्ये मधमाश्यांचे संगोपन करता येते.
पोळे म्हणून एक साधी लांब पेटी वापरली जाते. तिच्या वरील भागावर अनेक पट्ट्या असतात. या पेटीचा आकार साधारणपणे 100 सेंटीमीटर लांब, 45 सेंटीमीटर रुंद आणि 24 सेंटीमीटर उंच असा असतो. ही पेटी दोन सेंटीमीटर जाडीची असावी. त्यामध्ये एक सेंटीमीटर रुंदीच्या प्रवेशछिद्रांसहित पोळे एकत्र चिकटवलेले आणि स्क्रूने घट्ट केलेले असावे. पेटीमध्ये लावलेल्या प्रत्येक स्वतंत्र पट्टीला एकेक पोळे तयार करण्यासाठी मधमाश्यांना आवश्यक नैसर्गिक जागा मिळण्याच्या दृष्टीने 3.3 सेंटीमीटरची रुंदी ठेवणे गरजेचे असते. दगडी माशी, लहान माशी, भारतीय मधमाशी आणि युरोपियन मधमाशी अशा मधमाश्यांच्या चार प्रजाती भारतात उपलब्ध आहेत.
दगडी माशी प्रकारातील माशा उत्तम प्रकारे मध गोळा करतात आणि त्यांच्या प्रत्येक वसाहतीमागे सरासरी मधाचे उत्पादन 50 ते 80 किलो इतके असते. लहान माशी प्रकारातील मधमाश्या कमी मध गोळा करतात. त्यांच्या प्रत्येक वसाहतीमागे अंदाजे 200 ते 900 ग्रॅम इतका मध मिळतो. भारतीय मधमाशी प्रकारातील मधमाश्यांद्वारे होणारे मधाचे उत्पादन दरवर्षी प्रतिवसाहत सहा ते आठ किलो इतके असते. युरोपियन मधमाश्यांची वसाहतीमागे सरासरी मधउत्पादनाची क्षमता 25 ते 40 किलो इतकी असते. याशिवाय, केरळमध्ये डंखरहित मधमाशी ही एक प्रजाती उपलब्ध आहे. त्या खर्या अर्थाने डंखरहित नसतात; परंतु त्यांचा डंख पूर्णपणे विकसित झालेला नसतो. या मधमाश्या परागीकरण चांगल्या प्रकारे करतात. त्यांच्याद्वारे दरवर्षी 300 ते 400 ग्रॅम इतका मध मिळू शकतो.
पाण्याचा चांगला निचरा असलेल्या खुल्या जागेत मधउत्पादन केंद्र उभारावे. शक्यतो फळांच्या बागांजवळ त्याची उभारणी करावी. पोळ्यामधील तापमान आवश्यक तेवढे राखण्यासाठी सूर्यप्रकाशापासून संरक्षण करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे पोळ्याच्या स्टँडभोवती मुंग्या शिरू नयेत यासाठी त्याभोवती पाणी भरलेले खंदक ठेवावेत. वसाहतींचे तोंड पूर्व दिशेला असावे. पाऊस आणि सूर्यापासून पेटीचे रक्षण होण्यासाठी दिशेमध्ये थोडाफार बदल केला तरी चालतो. पाळीव जनावरे, अन्य प्राणी यांच्यापासून मधमाश्यांची वसाहत दूर ठेवावी. तयार केलेल्या पोळ्यामध्ये मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठी जुन्या पोळ्याचे करड्या रंगाचे तुकडे किंवा पोळ्यातील मेण नव्या पोळ्याला चोळावे. त्याच्या वासामुळे मधमाश्या त्याकडे आकर्षित होतात. शक्य झाले तर एखाद्या नैसर्गिक जथ्यामधून राणी मधमाशीला पकडून पोळ्याखाली ठेवावे. त्यामुळे अन्य मधमाश्या आकर्षित होण्यास मदत होते.
पोळ्यामध्ये वसविण्यात आलेल्या जथ्याला काही आठवडे अर्धा कप गरम पाण्यात अर्धा कप साखर विरघळवून अन्न द्यावे. मधांच्या पोळ्याची तपासणी शक्यतो सकाळच्या वेळी मधाच्या हंगामात आठवड्यातून एकदा करावी. मेणकिडे, मेणपतंग, तुडतुडे यापासून मधमाश्यांचे संरक्षण करावे. पोळ्याच्या ज्या भागातून मध काढायचा असेल, त्या भागातील मधमाश्यांना धुराचा उपयोग करून दूर करावे आणि काळजीपूर्वक पोळी कापून घ्यावीत. मधाची काढणी शक्यतो दोन मुख्य फुलोर्यांच्या मोसमादरम्यान आणि त्यानंतर लगेच करावी. ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि फेब्रुवारी-जूनमध्ये मधाची काढणी करणे शक्य होते. पिकलेले पोळे रंगाने पिवळे आणि मधाने भरलेले असते. दोन्ही बाजूंच्या निम्म्यापेक्षा अधिक मधाचे कप्पे मेणाने बंद केलेले असतात. आर्थिक प्राप्तीचा चांगला मार्ग म्हणून मधमाशीपालन व्यवसाय फायद्याचा ठरतो. शेतीच्या दृष्टीने फारशा मूल्यवान नसणार्या जागेत मध आणि मेण याचे उत्पादन करता येते. मध हे एक रुचकर आणि पोषक अन्न आहे. त्याला बाजारपेठेत असणारी मागणी लक्षात घेता या व्यवसायातून शेतकर्यांना आर्थिक उन्नती साधता येते.
– अनिल विद्याधर
पाहा व्हिडिओ : 10 वर्षांच्या आदिश्रीने बनवलेल्या अॅपवर आता मिळणार सगळ्या झाडांची माहिती