'कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींच्या समस्या मार्गी लावू' | पुढारी

'कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींच्या समस्या मार्गी लावू'

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींच्या समस्या मार्गी लावू, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना दिली. क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींच्या प्रश्नासंदर्भात मंत्री देसाई यांना निवेदन देऊन मंत्रालय स्तरावर बैठक घेण्याची मागणी केली. (Kolhapur)

क्षीरसागर यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात उद्योगाचा विस्तार होण्याच्या द़ृष्टीने अनुकूल परिस्थिती आहे. शहरांतर्गत छत्रपती शिवाजी उद्यमनगर औद्योगिक वसाहतीसह शिरोली, गोकुळ शिरगांव, कागल पंचतारांकित अशा मोठ्या आणि इचलकरंजी, हुपरी, जयसिंगपूर, हातकणंगले या लघु व मध्यम औद्योगिक वसाहतींना विविध समस्या भेडसावत आहेत. उद्योग वाढीस चालना देण्याच्या द़ृष्टीने वसाहतींचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणे अत्यावश्यक आहे. गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निर्यात जगातील विविध बाजारपेठांत होण्यासाठी व जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांची माहिती उद्योजकांना होण्यासाठी कायमस्वरुपी निर्यात सुविधा केंद्राची स्थापना करावी. विमानसेवेचा विस्तार व नाईट लँडिंगची सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न व्हावेत. (Kolhapur)

जिल्ह्यातील शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील जागा पूर्ण भरल्याने नव्या उद्योगांना चालना देण्यासाठी आणखी दोन औद्योगिक वसाहतींची निर्मिती करावी.राज्यातील औद्योगिक क्षेत्रासाठीचा वीज दर हा इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत वाजवी राहतील व किमान 3 वर्षे स्थिर ठेवावेत. औद्योगिक जिल्ह्यात कौशल्य विकास महाविद्यालय, कौशल्य विकास केंद्राची स्थापना करावी. मालवाहतूक सोयीस्कर होण्यासाठी रस्ते, अवजड वाहनांसाठी पार्किंगसह इतर सुविधा पुरवाव्यात. औद्योगिक कचर्‍याची योग्यरीतीने विल्हेवाट लावण्यासाठी जागा निश्चित कराव्यात. (Kolhapur)

Back to top button