कोल्हापूर जिल्हा बँक : दोन वर्षांनंतर बँकेचे अध्यक्षपद काँग्रेसला | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक : दोन वर्षांनंतर बँकेचे अध्यक्षपद काँग्रेसला

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीच्या काही नेत्यांच्या तालुक्यांत मते कमी मिळाल्यामुळे नाराज झालेले जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे आ. विनय कोरे यांनी सत्तारूढ आघाडीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा आपली खदखद व्यक्‍त केली. जिल्हा बँक मधील अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीपर्यंत त्यांची नाराजी कायम राहिली. दरम्यान, सत्तारूढ आघाडीच्या बैठकीत दोन वर्षांनी बँकेचे अध्यक्षपद काँग्रेसला व उपाध्यक्षपद जनसुराज्य शक्‍तीला या फॉर्म्युल्यावर तोडगा निघाल्याचे समजते.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या नावावर चर्चा करण्यासाठी सत्तारूढ आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य शक्‍ती पक्षाच्या नेत्यांची बैठक आज सकाळी शासकीय विश्रामधाम येथे बोलाविण्यात आली होती. त्यामुळे सकाळपासूनच शासकीय विश्रामधामचा परिसर कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता.

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आले. त्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील आले. बारा वाजण्याच्या सुमारास आ. पी. एन. पाटील दाखल झाले. सर्व नेते जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे आ. विनय कोरे यांची वाट पाहू लागली. साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते शासकीय विश्रामधामवर आले. त्यानंतर त्यांच्या चर्चा सुरू झाल्या.

आ. कोरे यांनी कोणाच्या तालुक्यात कोणाला मते जादा मिळाली, कोणाला कमी मिळाली याची माहिती दिली. हे कसे घडले, यावरून बैठकीत खडे बोल सुनावत नाराजी व्यक्‍त केल्याचे समजते. यावेळी अन्य नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी फारसे ऐकून घेतले नसल्याचे समजते. बैठकीस सर्वात उशिरा आलेले आ. कोरे बैठक संपण्यापूर्वी सर्वात अगोदर बैठकीतून निघून गेले.

बाहेर पडताना आ. कोरे यांना विचारले असता, आमचं सामंजस्याने करायचे ठरले आहे. असे सांगितले. बैठकीतील अधिक तपशील तुम्ही अन्य नेत्यांना विचारा, ते सांगतील, असे म्हणत त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले.

शासकीय विश्रामधाम येथेच शिवसेना आघाडीच्या संचालकांची बैठक बोलावली होती. या आघाडीचे नेते खा. संजय मंडलिक यांच्याशी पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली. दोन वाजेपर्यंत चर्चेचे गुर्‍हाळ सुरू होते.

दुपारी दोन वाजण्याच्या पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले, बँकेच्या अध्यक्षपदासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व उपाध्यक्षपदासाठी राजूबाबा आवळे यांचे एकमताने नाव निश्‍चित करण्यात आले आहे.

अध्यक्षपदासाठी सत्तारूढ आघाडीतून मुश्रीफ यांच्याशिवाय दुसरे कोणतेही नाव पुढे आले नाही. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आ. पी. एन. पाटील, आ. राजेश पाटील, आ. राजूबाबा आवळे, निवेदिता माने, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, भैया माने आदी उपस्थित होते.

आ. कोरेंनी केले मन मोकळे

आ. कोरे बैठकीस उशिरा येऊन लवकर गेले. आ. कोरे नाराज होऊन गेले काय? असे विचारले असता, मंत्री मुश्रीफ म्हणाले, ते मन मोकळे करून गेलेत. तर पालकमंत्री पाटील यांनी आमचे एकमताने ठरले आहे. आ. कोरे जेवण करून येतो असे सांगून गेलेत, असे ते म्हणाले.

विरोधी आघाडीकडे दुर्लक्ष

आजची बैठक सत्तारूढ आघाडीच्या 18 संचालकांची बैठक होती. त्यामुळे विरोधी आघाडीच्या सदस्यांशी चर्चा करण्याचा काही संबंध नाही, असे सांगत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी आघाडीकडे दुर्लक्ष केले.

जिल्हा बँकेत शिवसेना पहारेकर्‍याच्या भूमिकेत

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनिमित्त गुरुवारी बोलाविण्यात आलेल्या शिवसेना आघाडीच्या बैठकीत शिवसेनेमधील फाटाफूट पुन्हा एकदा दिसून आली. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी शिवसेनेच्या सर्व संचालकांना एकत्र राहण्याच्या सूचना दिल्या असतानाही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व माजी खा. निवेदिता माने यांनी सत्तारूढ आघाडीच्या बैठकीस उपस्थिती लावली.

दरम्यान, संख्याबळ नसल्यामुळे जिल्हा बँक अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेना आता बँकेत पहारेकर्‍याची भूमिका पार पाडेल असे खा संजय मंडलिक यांनी सांगितले. या बैठकीस संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अर्जुन आबिटकर उपस्थित होते.

 

Back to top button