Narayan Rane : नारायण राणे यांना अखेर अटक, संगमेश्वर येथून घेतलं ताब्यात

Narayan Rane : नारायण राणे यांना अखेर अटक, संगमेश्वर येथून घेतलं ताब्यात
Published on
Updated on

चिपळूण; पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अखेर अटक करण्यात आली आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांचा अटकपूर्व जामीन रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर लगेच त्यांना संगमेश्वर मधील गोळवली येथून रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येथे तणावाची स्थिती आहे.

दरम्यान, राणेंच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अटक करायला आलेले पोलिस अटक वॉरंट दाखवत नाहीत. अटक वॉरंट दाखवा असा सवाल आम्ही पोलिसांकडे केला. पण पोलिस आमच्यावर दबाव असल्याचे सांगत आहेत, असे जठार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जोपर्यंत राणेंची सुटका होत नाही तोपर्यंत भाजपचे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा जठार यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनी भाषण करताना हिरकमहोत्सवी स्वातंत्र्यमहोत्सव असा उल्लेख केला. त्याचा संदर्भ देत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 'कानाखाली आवाज काढला असता' असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत शिवसेनेने राज्यभरात आंदोलने केली.

राणे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत राज्यभरात ठिकठिकाणी राणे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नारायण राणे अटक करून न्यायालयासमोर हजार करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले होते. त्यानंतर राणे यांना ताब्यात घेण्यासाठी मंगळवारी सकाळपासून वेगाने हालचाली झाल्या. आज राणे चिपळूण, संगमेश्वर भागात जन आर्शीवाद यात्रेच्या निमित्ताने आले होते. या दरम्यान त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस आयुक्तांनी त्यांच्या अटकेचे आदेश दिले होते. तत्पुर्वी नारायण राणे यांनी जामीन अर्ज दाखल केला होता.

अटकेची शक्यता गृहीत धरून राणे यांनी रत्नागिरी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, कोर्टाने हा अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर लगेच त्यांना अटक करण्यात आली.

चिपळूणमध्ये राणे- शिवसेना समर्थकांमध्ये संघर्ष….

चिपळूण तालुका मराठा समाजातर्फे येथील आथिती हॉटेलसमोर महामार्गालगत नारायण राणे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. चिपळूण मध्ये मराठा समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना तलवार भेट दिली. याचवेळी शिवसैनिक चाल करत घटनास्थळी आले. यावेळी भाजप कार्यकर्ते त्यांना भिडले. सेना कार्यकर्त्यांनी राणे विरोधात घोषणा दिल्या. याचवेळी भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी मध्यस्थी करुन दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news