

कणकवली : पुढारी वृत्तसेवा
कणकवलीतील बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांना शिकारीचा छंद होता. हाच छंद त्यांच्या मृत्यूचे कारण ठरला आहे, असा निष्कर्ष पोलिस तपासात पुढे येत आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेला अमर कदम हा शिकारीतील त्यांचा नेहमीचाच सोबती होता. त्याने दिलेल्या जबाबामध्ये गोळी अनावधानाने लागल्याचे म्हटले आहे.
ही गोळी ज्या बंदुकीतून सुटून सुशांत दळवी यांना लागली, ती बंदुक नेमकी कोणाच्या ताब्यात होती. याचाही शोध पोलिस घेत आहेत. मात्र या प्रकरणात आता घातपातापेक्षाही शिकारीतील अतिघाई आणि बंदुक लोड असताना मोटारसायकल चालविणे यातूनच सुशांत दळवी यांना जीव गमवावा लागल्याची चर्चा आहे.
दरम्यान सुशांत दळवी यांच्यावर शनिवारी रात्री शेकडोंच्या उपस्थितीत कणकवली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांना शिकारीचा छंद असल्याने ते वरचेवर शिकारीला जात असत. गेल्या तीन वर्षांपासून कणकवली नरडवे नाका येथील बिल्डींग कामावर असलेला व सध्या पोलिसांनी अटक केलेला अमर कदम हा अनेकवेव्य त्यांच्यासोबत शिकारीला जात असे. कणकवली तसेच कळसुली परिसरात ते शिकारीला जात असत. गुरुवारी रात्रीही सुशांत व अमर हे दोघे यामाहा मोटारसायकलने सिंगल बरेलची बंदुक घेऊन नरडवे रोडजवळील मोहनमळा भागात गेले होते.
मोटारसायकलवरुन जात असताना जंगलमय भागात त्यांना एक शिकार दिसली. सुशांत याने अमरकडील बंदुक स्वतःकडे घेतली व ती लोड करत त्यांनी शिकारीचा पाठलाग सुरू केला. मात्र दुर्दैवाने शिकार झुडपात दिसेनाशी झाली. त्यानंतर घाईगडबडीत सुशांत याने ती बंदुक पुन्हा अनलोड न करता तशीच अमर कदम याच्या हातात दिली आणि दोघे गडनदीच्या दिशेने निघाले.
सुशांत मोटारसायकल चालवत असताना मागे लोड असलेली बंदुक घेवून अमर बसला होता. वाटेत दुचाकी खड्ड्यात गेल्याने त्या धक्क्यात अमरच्या हातात असलेल्या बंदुकीतून अचानक गोळी सुटली आणि ती पुढे बसलेल्या सुशांत याच्या मानेच्या खालील भागात शिरुन डोक्याच्या समोरुन मध्यभागातून बाहेर पडली, त्यानंतर दोघेही दुचाकीसह खाली कोसळले.
बंदुकीची गोळी लागल्याने सुशांत जागीच गतप्राण झाला होता. त्यानंतर घाबरलेल्या अमरने सुशांत याचा मृतदेह ओढत नेवून बाजूला टाकला आणि बंदुक घेत मोटारसायकलने पुन्हा कणकवली येथे येत नरडवे नाका येथील बिल्डींग साईटमधील कार्यालयात जाऊन राहिला. याच कार्यालयातून पोलिसांनी शुक्रवारी सकाळी १० वा.च्या सुमारास त्याला बंदुकीसह ताब्यात घेतले होते.
विनापरवाना बंदुकीचा मालक कोण?
सुशांत दळवी यांचा मृतदेह ज्या स्थितीत आढळून आला होता, त्यावरून प्रत्यक्षदर्शी तो खूनच असल्याचे दिसून येत होते. अनेकांनी घातपाताचाही संशय व्यक्त केला होता. मात्र, पोलिसांनी घटना उघडकीस आल्यानंतर काही तासांतच अमर कदम याला ताब्यात घेत त्याच्याकडून सत्य वदवून घेतले. सुरुवातीला तो पोलिसांना नीट माहिती देत नव्हता. मात्र काही वेळानंतर त्याने घडलेली हकीकत पोलिसांना सांगत बंदुकीची गोळी अनावधानाने सुशांत दळवी यांना लागल्याने सांगितले.
असे असले तरी ती बंदुक विनापरवाना असून ती सुशांत दळवी अथवा अन्य कुणाच्या ताब्यात होती, शिकारीला जाण्यापूर्वी कुणाकडून आणण्यात आली होती. याचाही शोध पोलिस घेणार आहेत. ही बंदुक विनापरवाना असल्याने त्याचा कारखाना कुठे आहे, याचाही शोध पोलिस घेत आहेत. अमर कदम याने सांगितलेल्या घटनाक्रमानुसार शिकारीतील अतिघाईमुळेच सुशांत दळवी यांना आपला जीव गमवावा लागला असल्याची चर्चा आहे