

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
गेल्या सात महिन्यांपासून जिल्ह्यातील १२ शिवभोजन केंद्रांचे अनुदान रखडल्यामुळे केंद्रचालक अडचणीत आले होते. गॅस टंचाईतही केंद्रचालकांकडून शिवभोजन केंद्रे सुरूच होती. अखेर रखडलेले सुमारे १ कोटी ३९ लाख ६८ हजार रूपये राज्य शासनाने मंजूर केले असून जिल्हा पुरवठा विभागाने केंद्र चालकांच्या खात्यावर मंजूर रक्कम वर्ग होण्यासाठी जिल्हा कोषागार विभागाकडे अनुदानाचा प्रस्ताव सादर केला आहे.
येत्या दोन दिवसांत ऑगस्ट २०२५ ते फेब्रुवारी २०२६ पर्यंतचे अनुदान लाभाथ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. गोरगरीब, कामगार, मजुरांना केवळ १० रूपयात पोटभर जेवण मिळावे यासाठी जिल्ह्यासह राज्यभरात शिवभोजन थाळी सुरू केली.
मात्र रत्नागिरी जिल्ह्यात शिवभोजन केंद्र चालकांना मागील सात महिन्यांपासून अनुदान न दिल्यामुळे केंद्रचालक अडचणीत सापडले होते. काहींनी परवडत नसल्यामुळे केंद्रे बंद केली होती. जिल्हा पुरवठा विभागाने जुलैपर्यंतचे अनुदान दिले होते. त्यानंतर ऑगस्ट ते फेब्रुवारीपर्यंतचे अनुदान अद्याप न आल्याने केंद्रचालक अडचणीत आले आहेत.
किराणा माल, गॅस सिलिंडर, कामगारांचा पगार यांचा खर्च भागत नसल्यामुळे शहरात एक, तर ग्रामीण भागातील १३ शिवभोजन केंद्रे बंद झाली. उर्वरित शिवभोजन केंद्र सुरू रहावीत यासाठी जिल्हा पुरवठा विभागातर्फे निधीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. अखेर राज्य शासनाकडून रत्नगिरी जिल्ह्यासाठी १ कोटी ३९ लाख ६८ हजार रूपये मंजूर झाले असून येत्या दोन दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे.
सिलिंडरचा केंद्र चालकांना फटका
युध्दजन्य परिस्थितीमुळे शासनाने व्यावसायिक एलपीजी सिलिंडर वितरणावर मर्यादा आणली आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. काही चुलीवर स्वयंपाक करीत हॉटेल सुरू ठेवले तर काहींनी हॉटेल बंद केले. एलपीजी तुटवड्यामुळे शिवभोजन केंद्रांना ही फटका बसत आहे. शासनाने सिलिंडर पुरवण्याबाबत शिवभोजन केंद्रांना कोणतीही सूट दिली नाही. त्यामुळे शिवभोजन चालकही अडचणीत सापडले आहेत.
अशी आहे शिवभोजन थाळीची स्थिती...
जिल्ह्यात एकूण २६ शिवभोजन केंद्रे सुरू होती. यामध्ये १२ सुरू आहेत, तर १४ केंद्र बंद झाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकूण ३०५० थाळ्या मंजूर आहेत, मात्र १५५० इतक्याच थाळ्या वापरण्यात येतात. त्यामुळे १५०० थाळ्या शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. शिवभोजन थाळीमध्ये २ चपात्या, एक वाटी भाजी, एक बाटी सुखी भाजी, एक वाटी भात अशी १० रूपयांत शिवभोजन थाळी दिली जाते.
रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाच्या कार्यालयास शिवभोजन योजनेसाठी १ कोटी ३९ लाख ६८ हजार इतके अनुदान प्राप्त झाले आहे. त्यानुसार ऑगस्ट ते फेब्रुवारीपर्यंतची देयके पूर्ण करून कोषागारात सादर केली आहेत. लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल.
- रोहिणी रजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी