

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने व माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून कुडाळ येथे स्थानापन्न होणा-या 'सिंधुदुर्गचा राजा' गणपतीची आज (दि.१९) श्री गणेश चतुर्थी दिवशी भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. यावर्षी सिंधुदुर्ग राजाचा उत्सव १७ दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये अनेक धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. दरम्यान कुडाळ तालुक्यात सर्वत्र मंगलमय वातावरणात घरोघरी श्री गणपती बाप्पाचे विधिवत पूजन करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
केंद्रीय मंत्री नारायण राणे, निलम राणे, माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने कुडाळ येथील पोस्ट ऑफीस चौक नजिक भाजप कार्यालय समोरील पटांगणात सिंधुदुर्ग राजा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया… च्या जयघोषात मंगळवारी या ठिकाणी सिंधुदुर्ग राजा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. प्रसिद्ध कायदेतज्ञ अॅड. अजित भणगे व नयन भणगे यांच्या हस्ते श्रींचे विधिवत पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानचे रणजित देसाई, ओंकार तेली, विनायक राणे, बंड्या सावंत, राकेश नेमळेकर, नागेश नेमळेकर, राजवीर पाटील, भूषण राणे, विश्वास पांगुळ, बाळा कुडाळकर, विनायक घाडी, पुरोहित बापट आदींसह गणेशभक्त उपस्थित होते.
यावर्षी सिंधुदुर्ग राजाचा उत्सव १७ दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये अनेक धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने साजरा करण्यात येणारा सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने अनेक उपक्रम सिंधुदुर्ग राजाच्या मंडपात आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, आयुष्यमान भारत योजना कार्ड वाटप, घरेलू कामगारांची नोंदणी, दिव्यांग बांधवांना मदत असे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर व कार्यावर आधारित छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे स्वतंत्र दालन देखील या मंडपात साकारण्यात आले आहे, अशी माहीती सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.
हेही वाचा :